HSRP Number Plate : एचएसआरपी नसलेल्या २४६८ वाहनांवर कारवाईचा बडगा
HSRP Number Plate : वाहतूक पोलिसांकडून वाहन मालकांना केला १२ लाखांहून अधिक दंड

पिंपरी – केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) बसवणे बंधनकारक आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक विभागाने जोरदार मोहीम उघडली आहे.
१ जानेवारी ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शहरात विनानंबर प्लेट व जुन्या नंबर प्लेटवर धावणाऱ्या तब्बल २ हजार ४६८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. संबंधित वाहन मालकांना १२ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
गुन्हेगारी कारवायांना आळा घालणे, बनावट नंबर प्लेटचा गैरवापर रोखणे आणि वाहन चोरीचे प्रकार उघडकीस आणणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) अनिवार्य केली आहे.
मात्र, मुदतवाढ आणि वारंवार जनजागृती करूनही अनेक वाहनचालक या नियमाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख चौकांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवून अशा वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे.
गेल्या दहा महिन्यांत केलेल्या या धडक कारवाईत दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. नंबर प्लेट नसणे, सदोष अथवा अस्पष्ट असणे आणि शासनाने प्रमाणित केलेली ‘एचएसआरपी’ न बसवणाऱ्या २,४६८ बेशिस्त चालकांवर दंडात्मक केसेस दाखल करून जागेवरच ई-चलानद्वारे १२ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
‘वाहनचालकांनी कारवाई टाळण्यासाठी आणि स्वतःच्या वाहनाच्या सुरक्षेसाठी अधिकृत संकेतस्थळावरून तातडीने एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, अन्यथा यापुढील काळात ही तपासणी मोहीम अधिक तीव्र केली जाईल आणि दंडात्मक कारवाईसोबतच पुढील कायदेशीर पावले उचलली जातीलत.’ – विक्रांत देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा.
Indapur : नीरा नदीला भाटघरमधून तीन टीएमसी पाणी सोडा; हर्षवर्धन पाटील यांची मागणी




