पुणे : पुणे शहरात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत असून, जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचून राहत आहे. याचा परिणाम शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच शहरातील मध्यवर्ती भागात विजेचा शॅाक बसून गाईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कसबा पेठ येथील शीतल देवी चौकात लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी घडली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस कोसळत आहे. आज देखील शहरात पहाटेपासून मुसळधार पावसाने जोर धरला होता. वादळवाऱ्यामुळे विजेची तार कसबा पेठे येथील शीतल देवी चौकात पडली होती. या ताऱ्यातील वीज पुरवठा सुरू होता. त्याचा शॅाक गाईला लागला आणि तिचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे. या प्रकरामुळे महावितरणचा निष्काळजीपणाचा कारभार पुन्हा समोर आला आहे. या जागी कोणतीही व्यक्ती असती तर त्याला देखील शॅाक बसला असता, यामुळे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी याची काळजी घ्यायला हवी होती, असे बोलले जात आहे.