covid vaccination : ग्रामीण भागासाठी लसीचे आणखी 83,760 डोस, ‘या’ भागाला मिळाले सर्वाधिक डोस

पुणे -ग्रामीण भागात करोना प्रतिबंधक आठवड्याला नियमित लसीचा पुरवठा होत आहे. गुरूवारी ग्रामीणसाठी आणखी 83 हजार 760 डोस आले आहेत. त्यानुसार केंद्रनिहाय त्याचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये कोविशील्ड लसीचे 76 हजार तर, कोवॅक्सिनच्या 7 हजार 760 डोसचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यात जवळपास आठशेहून अधिक लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. मिळणाऱ्या लसीच्या प्रमाणानुसार केंद्रांना त्याचे वितरण केले जाते. गुरूवारी कोविशील्डचे 76 हजार लसीचे डोस वितरित करण्यात आले.
त्यात सर्वाधिक इंदापूर तालुक्याला 9 हजार 300 डोस, खेडला 8 हजार 800 तसेच इंदापूर, जुन्नर, मावळ यासह अन्य तालुक्यांना लसीचे वाटप करण्यात आले. दरम्यान, कोवॅक्सिनचे 7 हजार 760 डोस आले असून,
दुसऱ्या डोससाठी ही लस देण्यात येणार आहे. त्यामध्ये औंध जिल्हा रूग्णालयात 1 हजार 400 लसीचे डोस आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाला वेग येण्याची शक्यता आहे.





