COVID-19 : डोंबिवलीतील रुग्णाचा कोविडमुळे मृत्यू; दोन दिवसात 2 जण दगावले

डोंबिवली – देशासह राज्यात करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आता राज्यात दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कल्याणमध्ये 47 वर्षांच्या एका महिलेचा कोविडमुळे मृत्यू झाला होता.
त्यानंतर डोंबिवलीतील एका 64 वर्षीय व्यक्तीचाही कोविडमुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती आहे. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दोनच दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेतील एका 47 वर्षीय महिलेचा कोविडमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ आता डोंबिवलीमधील एका 64 वर्षीय पुरुषाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
विशेष म्हणजे कोविडमुळे मृत्यू झालेल्या या दोन्ही व्यक्तींना पूर्वीचे गंभीर आजार असल्याची माहितीही केडीएमसी आरोग्य विभागाने दिली आहे. तर सध्या केडीएमसी क्षेत्रात कोविडचा एक रुग्ण असून सध्या तो होम आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती देण्यात आली आहे.





