Covid-19: करोनाचा उद्रेक टाळण्यासाठी ऍडव्हायजरी जारी

नवी दिल्ली – नागरिकांनी तात्काळ कोविड संबंधी नियमांचे पालन सुरू करावे अशी सूचना इंडिटन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे. तसेच करोनाचा उद्रेक टाळण्यासाठी उपाय करण्याच्या संदर्भात एक ऍडव्हायजरीही जारी केली आहे. त्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क, सुरक्षित अंतर राखणे, साबण आणि पाण्याने हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे आदी सूचनांचा समावेश आहे.
विवाह, राजकीय आणि सामाजिक बैठका आदी गर्दीचे प्रकार टाळण्याचे सांगतानाच परदेश प्रवास टाळावा असे नमूद करण्यात आले आहे. ताप, घशात खवखवणे, खोकला, जुलाब आदी लक्षणे असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेत योग्य खबरदारी घ्यावी आणि करोनाविरोधी लस घ्यावी असे आयएमएने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांत अनेक देशांत करोनाच्या रूग्णांत लक्षणीय वाढ झाल्याचे आढळून आले आहे. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि ब्राझिल आदी प्रमुख देशांत 5.37 लाख नवे रूग्ण आढळून आले आहेत. भारतात गेल्या 24 तासांत 145 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यात चीनमध्ये सध्या आढळलेल्या बीएफ 7 या करोनाच्या नव्या अवताराची लागण झालेल्या चार जणांचा समावेश आहे.
सध्याची स्थिती चिंता करण्यासारखी नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र खबरदारी घेणे हाच योग्य उपाय असल्याचे आयएमएने म्हटले आहे.





