क्रिकेटर पृथ्वी शॉला ‘त्या’ प्रकरणी कोर्टाने बजावले दुसरं समन्स; 1 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे दिले निर्देश

मुंबई : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये सोशल मीडिया स्टार सपना गिल सेल्फी प्रकरणी क्रिकेटर पृथ्वी शॉला कोर्टाकडून दुसरं समन्स जारी करण्यात आलं आहे. या समन्सनुसार त्याला 1 ऑक्टोबरला मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.याआधी 30 एप्रिलला कोर्टाने पृथ्वी शॉला पहिलं समन्स बजावलं होतं.
काय आहे नेमके प्रकरण?
मुंबईतील हॉटेलबाहेर भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ याचा एका तरुणीसोबत वाद झाला. सेल्फी घेण्यावरुन हा वाद झाला असल्याचं समोर आलं. पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढताना हाणामारी झाल्याचे समोर आले होते. ही घटना जोगेश्वरी लिंक रोड येथील लोटसच्या पेट्रोल पंपाजवळ घडली होती. पृथ्वी शॉच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ याचा एका हॉटेलात पार्टी सुरु असताना सेल्फी काढण्यावरुन वाद झाला. त्यानंतर हॉटेलमधून शॉ दुसऱ्या कारने घराकडे निघाला होता. त्यादरम्यान त्याच्या मित्राच्या कारमध्ये तो असल्याचं संबधितांना वाटलं आणि तरुणी आणि तिच्या मित्रांनी त्या कारवर हल्ला केला होता.
कोण आहे सपना गिल ?
सपना गिल भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सपना तिचं ग्लॅमर आणि अभिनयाच्या जोरावर भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये हळूहळू आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे. सपना गिल सध्या 26 वर्षांची आहे. सपनाचा जन्म पंजाबची राजधानी चंदीगड येथे झाला. सपनाने ‘काशी अमरनाथ’ आणि ‘निरहुआ चलल लंदन’ या चित्रपटांमध्ये भोजपुरी सुपरस्टार अभिनेता रवि किशन आणि दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती क्रिकेटर पृथ्वी शॉ सोबतच्या वादामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती.
पृथ्वी शॉ बद्दल बोलायचे झाल्यास तो भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे, मात्र आता तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने आपले स्थान गमावले आहे. पृथ्वी शॉने भारतासाठी 5 कसोटी सामन्यात 339 धावा केल्या आहेत. याशिवाय पृथ्वी शॉने 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये 189 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉने भारतासाठी फक्त 1 टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. ज्यामध्ये तो आपले खातेही उघडू शकला नाही. पृथ्वी शॉने 79 IPL सामन्यात 1892 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉने 52 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4346 धावा केल्या आहेत ज्यात 13 शतके आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. पृथ्वी शॉ हा अतिशय आक्रमक फलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या शैलीत कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉचा समावेश होतो. पृथ्वी शॉची प्रथम श्रेणी सामन्यातील सर्वोत्तम धावसंख्या 379 आहे.





