नामी शक्कल : 161 निमंत्रितांसह त्यांनी केलं स्पेशल विमानात लग्न

मदुराई: लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हटलं जातं. पण म्हणून कोणी आकाशात जाऊन लग्न करत नसतं. मात्र सध्या करोनाचा कहर पाहता, एका विवाहाला फक्त 50 जणांनाच परवानगी आहे.
असं असल्यानं मदुराई येथील एका दाम्पत्यानं नामी शक्कल लढवत, एक चार्टर विमान बुक करुन, चक्क त्या उडत्या विमानात 161 वऱ्हाडींसह आपला विवाह समारंभ उरकला.
या विवाहाची आता देशभर चर्चा सुरु असून त्याचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मिडीयामध्ये व्हायरल होत आहेत. राकेश आणि दक्षिणा ही या दाम्पत्याची नावं आहेत.
या विवाहासाठी एअरलाईन कंपनीने विशेष विमान उपलब्ध करुन दिलं आणि सर्व सहभागी व्यक्तींची कोविड चाचणी निगेटीव्ह असल्याची खात्रीही करण्यात आली होती. रविवारी सकाळी मदुराईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या विशेष विमानाने उड्डाण घेतले आणि मीनाक्षी अम्मन मंदिराच्या शिखराच्या वरती घिरट्या घालत असताना, या दाम्पत्याने विवाहाची गाठ बांधली.
या विवाहाच्या सोशल मीडियामध्ये प्रसारित होणाऱ्या लग्नाच्या फोटोंना नेटिझन्सचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तर दुसरीकडे कायदेशीर मुद्देही उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी एअरलाइन कंपनीला स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक सुजित कुमार म्हणाले की शहर किंवा ग्रामीण हद्दीत गुन्हा नोंदविला जावा की नाही हा निर्णय घेण्यात आला आहे कारण हा एक विचित्र उल्लंघन आहे. तर विमानतळ संचालक एस. सेंथिल वलावन म्हणाले की, खासगी विमान कंपनीने चार्टर फ्लाईटसाठी अर्ज केला होता आणि विमानतळ प्राधिकरणाने त्याला मान्यता दिली. ही मान्यता देताना सर्वजण कोव्हिड निगेटीव्ह असल्याची खात्री करण्यात आली होती.





