Counterfeit notes: बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Counterfeit notes:

चौघांना अटक; पाच लाख ६४ हजारांच्या बनावट नोटा जप्त
Counterfeit notes: पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक करून पाच लाख ६४ हजार रुपये किमतीच्या एकूण एक हजार १२८ बनावट नोटा, तसेच नोटा छापण्यासाठी वापरलेला प्रिंटर, मॉनिटर, सीपीयू आणि अन्य साहित्य जप्त केले. विश्रामबाग पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.
सलमान जैनुद्दीन राजे (वय ३०, रा. आंबेगाव ता. दौंड, जि. पुणे), शाफाज फिरोज अन्सारी (वय ३०, रा. नालासोपारा), विशाल विलास गलांडे (वय ३७, रा. सुरूपखणवाडी, ता. माण, जि. सातारा) आणि अभिजीत रावसाहेब कांबळे (वय ३०, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट नोटा घेऊन एक संशयित महात्मा फुले मंडई परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सचिन अहिवळे आणि शैलेश सुर्वे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांना दिली.
त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे पावणेपाचच्या सुमारास मंडईच्या मागील बाजूस पोलिसांनी सापळा रचून सलमान राजेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या ८०५ बनावट नोटा आढळल्या. याप्रकरणी सचिन अहिवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
सातारा, कोल्हापुरात कारवाई
राजेकडे चौकशी केली असता, आणखी तीन साथीदार सहभागी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी सातारा व कोल्हापूर येथे जाऊन शाफाज अन्सारी, विशाल गलांडे आणि अभिजीत कांबळेला ताब्यात घेतले. गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक केली.
नोटांसह मुद्देमाल जप्त
अन्सारीच्या घरातून पाचशे रुपयांच्या ३२३ बनावट नोटा जप्त केल्या, तसेच नोटा तयार करण्यासाठी वापरलेला प्रिंटर, मॉनिटर, की-बोर्ड व माऊस, सीपीयू व अन्य साहित्य असा एकूण २१ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप, निरीक्षक विकास भिंगारदिवे व रमेश लाहिगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.





