वाराणसी : उत्तर प्रदेश अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन आणि पोलिसांनी मिळून एका मोठ्या कोडिन-आधारित कफ सिरपच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे सिरप नशेशी संबंधित कामांसाठी वापरले जात होते. वाराणसी हे या रॅकेटचे मुख्य केंद्र होते. या कारवाईत तब्बल ९३ हजार बाटल्यांसह २ कोटी रुपयांचा मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, कोडिन-आधारित कफ सिरपच्या गैरवापरामुळे अनेक देशांनी याच्या वापरावर आणि विक्रीवर निर्बंध घातले आहेत. डीसीपी प्रमोद कुमार यांनी सांगितले की, एका गुप्त माहितीच्या आधारे वाराणसीच्या रोहनिया भागातील एका गोदामावर बुधवारी छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिस पथकाने भद्वार परिसरातील एका गोदामातून ९३ हजार कफ सिरपच्या बाटल्यांसह सुमारे दोन कोटी रुपयांचा हा माल जप्त केला. हे गोदाम महेश सिंग नावाच्या व्यक्तीचे असून त्याला शोधण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या मोठ्या कारवाईची सुरुवात ऑक्टोबरमध्ये सोनभद्र येथून झाली. या रॅकेटचे जाळे बांगलादेश आणि आखाती देशांपर्यंत पसरले असल्याचा संशय आहे. ३ नोव्हेंबर रोजी गाझियाबाद पोलिसांनी पश्चिम उत्तर प्रदेशातील त्यांचे जाळे उघडकीस आणले. वाराणसीमध्ये ५१ कंपन्यांची चौकशी करणाऱ्या ड्रग निरीक्षकांच्या पथकाचे नेतृत्व करणारे जुनाब अली यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, “कोडिन-आधारित कफ सिरपच्या काळ्या बाजाराला उघडकीस आणण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेच्या सुरुवातीलाच हे समोर आले की वाराणसीतील पुरवठादार शुभम जैस्वालने ९३ कंपन्यांना सिरपचा पुरवठा केला होता, त्यापैकी ५१ कंपन्या वाराणसीत होत्या. यापैकी ३१ कंपन्यांची चौकशी पूर्ण झाली असून, शनिवारी कोतवाली पोलिसात २८ कंपन्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, जेणेकरून सखोल तपास करता येईल.”