खोकल्याचं औषध बनलं जीवघेणं ; २२ दिवसात ‘या’ औषधामुळे सात मुलांचा मृत्यू

Cough Syrup। मध्य प्रदेशातील छिंदवाडा याठिकाणी २२ दिवसांत सहा आणि राजस्थानातील सिकरमध्ये एका बालकाच्या झालेल्या मृत्यूमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सर्व प्रकरणांमध्ये मुलांना मूत्रपिंड निकामी झाल्याचे आढळून आले आहे. आजारी मुलांमध्ये सुरुवातीची लक्षणे सर्दी, खोकला आणि ताप असल्याने डेक्स्ट्रोमेथोर्फन या कफ सिरपमुळे मृत्यू झाल्याचे असू शकते असा संशय आहे. मात्र, मध्य प्रदेश सरकारने ही भीती निराधार असल्याचे म्हटले आहे.
२२ दिवसांत सहा मृत्यू, चौकशी सुरू Cough Syrup।
अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, ४ ते २६ सप्टेंबर दरम्यान छिंदवाडा याठिकाणी सहा बालकांचा मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. पीडितांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की सुरुवातीला मुलांना सर्दी आणि तापाचा त्रास होता, परंतु नंतर त्यांच्या मूत्रपिंडांची स्थिती बिघडली. छिंदवाडा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश गुन्नाडे यांनी, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या पथकांना बोलावण्यात आले आहे,” अशी माहिती दिली. त्यांनी पुढे सांगितले की, नागपुरात तीन बालकांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आणि उर्वरित बालकांचा छिंदवाडा येथे मृत्यू झाला. पाणी, औषधे आणि इतर साहित्याचे नमुने गोळा करून चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत आणि अहवालाची वाट पाहत आहेत.
काही कफ सिरपवर बंदी
डॉ. गुन्नाडे यांनी सांगितले की मृतांच्या घरात काही कफ सिरप आढळले. खबरदारी म्हणून, या औषधांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे आणि त्यांची विक्री थांबवण्यात आली आहे. सध्या पाच मुलांना नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाचा इशारा Cough Syrup।
जिल्हाधिकारी शीलेंद्र सिंह यांनी सांगितले की, भोपाळ आणि दिल्ली याठिकाणी तज्ज्ञांचे पथक तपास करत आहे. पुण्यातील प्रयोगशाळेच्या अहवालात विषाणूजन्य संसर्गाची शक्यता नाकारण्यात आली आहे. त्यांनी पालकांना डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय मुलांना कफ सिरप देऊ नका असा इशारा दिला.
राजस्थानमध्ये एकाचा मृत्यू, १९ बॅचेसवर बंदी
राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात एका मुलाच्या मृत्यूचा संबंध कफ सिरपशी जोडला जात आहे. परिणामी, राजस्थान मेडिकल कॉर्पोरेशनने सिरपच्या १९ बॅचेसच्या विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे आणि डॉक्टर आणि फार्मासिस्टना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
आरोग्यमंत्र्यांनी काय म्हटले?
मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी सांगितले की, कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा निराधार आहे. ते म्हणाले की, नमुने आयसीएमआर आणि नागपूर येथील प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल.





