Cosmos Bank : कॉसमॉस बँकेच्या स्मॉल फायनान्स बिझनेस विभागाचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात; दोन वर्षांत 48 कोटींचा व्यवसाय
Cosmos Bank : कॉसमॉस बँकेच्या स्मॉल फायनान्स बिझनेस विभागाने दुसरा वर्धापनदिन साजरा केला. दोन वर्षांत ४८ कोटींचा व्यवसाय, १,५०० हून अधिक ग्राहकांना अर्थसहाय्य आणि मुंबई, नाशिक, कोल्हापूर व गुजरातमध्ये विस्ताराची घोषणा.

Cosmos Bank : देशातील दुसऱ्या क्रमांकाची सहकारी बँक असलेल्या कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या स्मॉल फायनान्स बिझनेस (SFB) विभागाने दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा केला. आर्थिकदृष्ट्या वंचित घटक, सर्वसामान्य नागरिक आणि लघुउद्योजकांना सुलभ आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या विभागाने अवघ्या दोन वर्षांत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.
स्मॉल फायनान्स बिझनेस विभागाची स्थापना १ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आली होती. या विभागाचे उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले होते. स्थापनेपासून आतापर्यंत विभागाने तब्बल ४८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून १,५०० हून अधिक ग्राहकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे.
सावकारांच्या तुलनेत वाजवी व्याजदरात कर्जपुरवठा करून आर्थिक समावेशनाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न बँकेने केला आहे. सध्या पुणे जिल्ह्यात या विभागामार्फत ५ लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक आणि व्यवसाय कर्ज, तसेच २० लाख रुपयांपर्यंत वाहन कर्ज अत्यल्प कागदपत्रांवर उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे, विभागाच्या कर्जपोर्टफोलिओतील थकबाकीचे प्रमाण एकूण व्यवसायाच्या केवळ ०.१९ टक्के इतके असल्याची माहिती बँकेने दिली.
यशस्वी वाटचालीनंतर आता स्मॉल फायनान्स बिझनेस विभागाचा विस्तार करण्याचे नियोजनही बँकेने आखले आहे. आगामी काळात मुंबई, नाशिक, कोल्हापूर तसेच गुजरात येथे या विभागाच्या सेवांचा विस्तार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
द्वितीय वर्धापनदिन कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष सचिन आपटे, ज्येष्ठ संचालक अॅड. प्रल्हाद कोकरे, अजित गिजरे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अमरनाथ चक्रदेव, सहव्यवस्थापकीय संचालिका (क्रेडिट) नयन लगड, सहव्यवस्थापकीय संचालिका (ऑपरेशन्स) आरती ढोले, महाव्यवस्थापक (स्मॉल फायनान्स बिझनेस विभाग) अर्चना जोशी यांच्यासह बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.





