Pune : करोनाकाळातही महापालिकेत भ्रष्टाचार

पुणे – करोनाकाळात भारतीय जनता पक्षाने सर्व नियम बाजूला ठेवून अनेक चुकीची कामे करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत याप्रकरणी महापालिका प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी करत शहर कॉंग्रेसच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले.
करोनाकाळात आरोग्य सुविधांच्या नावाखाली भाजपने तातडीची कामे दाखवित शेकडो कोटींचे प्रस्ताव मंजूर केले. त्यात देखभाल दुरुस्ती, स्वच्छता, विद्युत अशा कामांच्या नावाखाली हा खर्च केला. तर, अनेक कामांची दुबार बिले काढत पुणेकरांच्या पैशांची लूट केल्याचा आरोप शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या खर्चाचा अहवाल सादर करणे अपेक्षित असून त्याबाबत मागणी होत असतानाही प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली हा भ्रष्टाचार दडपत असल्याचा आरोप करण्यात आला.
कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते आबा बागूल, अरविंद शिंदे, उपाध्यक्ष गोपाळ तिवारी, राज्य सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, संजय बालगुडे, नगरसेवक अविनाश बागवे, रवींद्र धंगेकर, लता राजगुरू, वैशाली मराठे, वीरेंद्र किराड, मुख्तार शेख, सुधीर काळे, सुजीत यादव, राजेंद्र शिरसाट, विशाल मलके, साहील केदारी, सोनाली मारणे, सुरेखा खंडागळे, शिलार रतनगिरी आदी उपस्थित होते.





