Dhanvantari Gold Scheme: नगरसेवकांना फुकट उपचाराची अपेक्षा! कोट्यवधींचा खर्च करून निवडून आले, आता उपचारही मोफत हवेत?
Dhanvantari Gold Scheme: ‘धन्वंतरी गोल्ड’ योजनेतून खासगी रुग्णालयांत उपचार देण्याचा प्रस्ताव

पिंपरी – निवडणुकीत मोठा खर्च करून नगरसेवकपद मिळविल्यानंतर आता महापालिकेच्या खर्चातून नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘धन्वंतरी गोल्ड योजना’ नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आधीच आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकप्रतिनिधींना महापालिकेच्या तिजोरीतून वैद्यकीय सुविधा देण्याची गरज काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय उपचाराची सुविधा देणारी धन्वंतरी गोल्ड योजना सध्या अस्तित्वात आहे. या योजनेच्या धर्तीवर विद्यमान नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही वैद्यकीय सुविधा देण्याबाबत प्रस्ताव पुढे आला आहे.
त्यासाठी धन्वंतरी गोल्ड समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या सभेत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
प्रस्तावात विद्यमान नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय सुविधा पुरविण्याकरिता धन्वंतरी गोल्ड योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सक्षम समितीची मान्यता आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच योजना नव्याने विद्यमान नगरसेवकांना लागू करता येत असल्याने त्याबाबत धोरणात्मक बाब म्हणून विचार करण्याची नोंद प्रस्तावात करण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
महापालिका निवडणुकीत उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला. काही उमेदवारांनी प्रचार, कार्यकर्ते, वाहनव्यवस्था, सभा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा खर्च केल्याचे नगरसेवक स्वतः खासगीत बोलत आहेत. असे असताना लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या मानधनासह आता महापालिकेच्या निधीतून कुटुंबीयांच्या वैद्यकीय उपचाराची सुविधा देण्याचा प्रस्ताव आल्याने टीका होऊ लागली आहे.
नगरसेवकांना विशेष सुविधा कशासाठी?
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना अनेकदा सुविधा, औषधे, तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेसाठी अडचणींचा सामना करावा लागतो.
दुसरीकडे, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकप्रतिनिधींसाठी खासगी रुग्णालयातील उपचाराची सुविधा महापालिकेच्या योजनेतून देण्यासाठी हालचाली सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगरसेवक हे नागरिकांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि त्यासाठी होणारा सार्वजनिक खर्च पारदर्शक असणे अपेक्षित आहे.
धन्वंतरी गोल्ड योजनेचा विस्तार केल्यास त्यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर किती आर्थिक भार पडणार, किती नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांना लाभ मिळणार, वर्षाला किती खर्च अपेक्षित आहे आणि खासगी रुग्णालयांमध्ये कोणत्या उपचारांचा खर्च योजनेतून केला जाणार, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
‘या विषयाला मान्यता मिळाल्यानंतर नगरसेवकांकडून प्रपत्र अ आणि ब भरून घेतले जाणार आहेत. ज्यांना लाभ घ्यायचा आहे, ते घेऊ शकतात. नगरसेवक त्यांचे पती किंवा पत्नी आणि दोन मुले अशा पद्धतीने लाभ देण्यात येईल. त्यासाठी नगरसेवकांच्या मानधनातून १५०० रुपये घेण्यात येणार आहे.’- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.





