Corova Vaccination | लसीकरण थांबवले तर… – तज्ञांचा गंभीर इशारा

लंडन – जगभरात करोनाच्या विरोधात लसीकरणाची मोहीम राबवली जात असून ऑक्स्फर्ड ऍस्ट्राझेनेकाची लस दिली जात आहे. त्यातच या लसीच्या संदर्भात नकारात्मक बातम्या आल्यामुळे काही देशांनी लसीकरण थांबवल्याच्याही बातम्या आहेत. मात्र असे केले तर त्याचा फायदा कमी आणि नुकसानच जास्त होईल असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
ऍस्ट्राझेनेकाची लस दिल्यामुळे रक्तात गुठळी निर्माण होत असून ती घातक असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर जर्मनी, फ्रान्स, इटली आणि अन्य काही देशांनी लसीकरण थांबवले आहे. मात्र असे करणे चुकीचे आहे. कोणतीही ठोस माहिती आणि आधार नसताना एखादी लस अशी थांबवणे धोक्याचे असल्याचे तज्ञांनी सांगितले.
अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या तज्ञ संशोधक सुसान एलेनबर्ग म्हणाल्या की, कोणतीही लस तयार करताना त्यामुळे संसर्ग रोखवला जाईल व आजाराचा बंदोबस्त होईल याचाच विचार केला जातो. मात्र मानवाला होणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीला ती लस थोपवू शकत नाही. त्यामुळे जेव्हा एखाद्या लसीचा वापर जगभर केला जातो तेव्हा ज्याची शंका असतील अशा गोष्टी घडत असतात.
लस दिल्याच्या वेळी जर अशा काही घटना घडल्या तर लोकांच्या मनात साहजिकच त्यामुळे लसीबाबत संशय निर्माण होतो. कोणतीही नवी लस बाजारात येते व ती सर्वसामान्यांसाठी असते तेव्हा आरोग्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र रक्ताची गुठळी निर्माण होणे आणि ही लस यांचा परस्पर संबंध अद्याप सिध्द झालेला नाही. जर आता लस देणे थांबवले तर चांगले होण्यापेक्षा वाईटच जास्त होईल.
ब्रिटनच्या एका विद्यापीठाचे तज्ञ मायकेल म्हणाले की, कोणत्याही लसीचा वापर थांबवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्याकडे ठोस आकडेवारी असली पाहिजे. जर लस टाळली किंवा विलंब केला तर आणखी जास्त जण मृत्युमुखी पडतील.





