‘ओमायक्रॉन’ व्हेरियंटमुळे फेब्रुवारीमध्ये येऊ शकते तिसरी लाट; IIT बॉम्बेने दिली चेतावणी

मुंबई – ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका भारतात वाढल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या नव्या व्हेरियंटमुळे देशात करोनाची तिसरी लाट फेब्रुवारीमध्ये येऊ शकते. तथापि, दुसऱ्या लाटेपेक्षा ते ही लाट कमकुवत राहण्याची देखील अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. असे दावे आयआयटीच्या डेटा सायंटिस्ट टीमने केले आहेत.
तिसऱ्या लाटेत त्यांच्या मते, जास्तीत जास्त प्रकरणे दररोज 1 ते 1.5 लाखांपर्यंत येऊ शकतात. करोना रिसर्ज टीममध्ये सहभागी असलेले डेटा सायंटिस्ट मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, या मोठ्या आकड्यामागे ओमायक्रॉनचा सर्वात मोठा प्रभाव असू शकतो.
करोनाच्या या नवीन प्रकारामुळे अनेक नवनवीन शंका निर्माण झाल्या आहेत. असे जरी असले तरी आतापर्यंत असे दिसून आले आहे की ओमायक्रॉन डेल्टासारखा घातक नाही. दक्षिण आफ्रिकेत आढळून येत असलेल्या रुग्णांकडे पाहण्याची गरज आहे. जिथे रुग्णांची संख्या जास्त असूनही रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. मात्र या व्हेरियंटला हलक्यात घेता येणार नाही. येत्या काही दिवसांत नवीन संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांचे प्रमाण पाहता परिस्थिती अधिक स्पष्ट होईल.असेही या टीमकडून सांगण्यात आले आहे.





