CoronaUpdates : पंतप्रधान मोदी नुकतेच परतलेल्या बांगलादेशातही देशव्यापी ‘लॉकडाऊन’

ढाका – जागतीक पातळीवर करोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपातील अनेक देश लॉकडाऊन असताना आता आशिया खंडातील बांगलादेशने देखील देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच बांगलादेश दौऱ्याहून परतले आहेत. त्यानंतर काही दिवसांतच बांगलादेशमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे बांगलादेशने पुन्हा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. गेल्या एका महिन्यात बांगलादेशमध्ये करोनाबाधितांच्या वाढत्या आकड्यांमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. बांगलादेश सरकारनुसार, सोमवारपासून आठवड्याभरासाठी हा लॉकडाऊन लागू करण्यात येईल.
रस्ते वाहतूक आणि पूल मंत्री ओबेदुल कादीर यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, करोनाची दूसरी लाट रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ओबेदुल कादीर यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बांगलादेशमध्ये 7 दिवसांचा लॉकाडाऊन करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. उद्या ५ एप्रिलपासून ७ दिवस हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात देशातील सर्व कार्यालये आणि कोर्ट बंद राहणार आहेत. परंतु, उद्योग आणि मिल्स रोटेशनपद्धतीने सुरू राहणार असल्याचं कादीर यांनी सांगितले. या आठवड्याभराच्या लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येवर सकारात्मक परिणाम होईल, अशी आशा बांगलादेश सरकारला आहे.





