करोनाची दुसरी लाट नियंत्रणात; वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा दुजोरा

सागर येवले
पुणे – करोनाच्या संसर्गितापासून अन्य व्यक्तींना होणाऱ्या संसर्गाचा दर म्हणजेच आर. व्हॅल्यू हा ऑगस्टमध्ये 1.17 होता. ती सप्टेंबरच्या मध्यात 0. 92 टक्क्यांवर पोहोचली आहे. हा दर एकच्या आत येणे ही करोनाची दुसरी लाट ओसरण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
आर. व्हॅल्यू मात्र काही शहरात अद्याप एक पेक्षा अधिक आहे. त्यात मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू या शहरांचा समावेश आहे. दुसऱ्या लाटेत देशात सर्वात भीषण अवस्था झालेल्या दिल्ली आणि पुण्यात मात्र, हा दर एक पेक्षा कमी आहे. महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांचा दर एक पेक्षा कमी अल्याने सर्वाधिक सक्रिय बाधित असणाऱ्या या दोन राज्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ऑगस्टच्या अखेरीस हा दर 1.17 होता. तो घसरून चार ते सात सप्टेंबर दरम्यान 1.11वर आला. त्यानंतर मात्र तो सातत्याने एकपेक्षा कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एका बाजूला ही समाधानाची बाब असली तरी त्याचवेळी केरळमध्ये एकाच दिवशी 15 हजार768 बाधित सापडले. तर त्या राज्यात 214 जणांचे मृत्यू झाले. तर केरळमध्ये बरे झालेल्यांची दिवसभरातील संख्या 21 हजार357 होते. तरीही राज्यात या घडीला एक लाख 61 हजार 195 सक्रिय बाधित आहेत.
मुलांवरील लसीच्या चाचण्या पूर्ण
करोना लसीच्या मुलांवरील दुसऱ्या आणि टप्प्यातील चाचण्या भारत बायोटेकने पूर्ण केल्या 18 वर्षांखालील मुलांवर घेतलेल्या या चाचणीचा तपशील पुढील आठवड्यात औषध नियामकांना सादर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी दिली.





