CoronaNews : मोदी सरकारचा मोठा निर्णय; परदेशी लशींचा भारतात येण्याचा मार्ग आणखी सुकर

नवी दिल्ली – देशभरात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक राज्यात करोनाने धुमाकूळ घातला असून लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी सरकारकडून लसीकरणाला बळ देण्यात येत आहे. त्यासाठी परदेशी लशींना मान्यता देण्यात आली आहे. आता केंद्र सरकारने परदेशी लशी भारतात आयात करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ लस लवकरच भारतात दाखल होत आहे. तर फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लसी भारतात येण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार परदेशातून आयात होणाऱ्या करोना लसीवरील १० टक्के आयात कर रद्द करण्याचा विचार करत आहे. तसेच कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय या लशी आयात होऊन खासगी बाजारतून विक्री करण्यात येतील, असं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.
दरम्यान या लशींची किंमत ठरविण्याचा अधिकार त्या-त्या कंपनीला देण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे. अनेक आशियाई देशात करोना लसीच्या आयातीवर १० ते २० टक्क्यांपर्यंत आयात कर लावण्यात येत आहे.





