पोस्ट ऑफिसमध्ये करा करोना लसीकरण नोंदणी, ‘अशी’ असेल प्रक्रिया

नवी दिल्ली – देशात करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. करोनामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकमेव उपाय लसीकरण हा आहे. सर्व वयोगटातील नागरीकांना लसीकरण देण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये गती येण्यासाठी भारतीय पोस्ट खात्याची सुद्धा मदत घेतली जाणार आहे. लसीकरण मोहिमेत टपाल विभागाने स्वत:हून पुढाकार घेतला आहे. करोना लसीकरणासाठी आता पोस्ट ऑफिसमध्ये नोंदणी करता येणार आहे.
ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही किंवा ज्यांच्याकडे फोन असला तरी लसीची नोंदणी करण्यात समस्य़ा येत आहेत. ते आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसची मदत घेऊ शकतात. ही सुविधा नुकतीच तेलंगणाच्या ग्रामीण भागात सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील बर्याच लोकांकडे अजूनही स्मार्टफोन नाहीत. हे लक्षात घेता लोकांना मदत करण्यासाठी भारतीय टपाल खात्याने नोंदणी विनामूल्य सुरू केली आहे. करोना लसीसाठी पोस्ट ऑफिसमध्ये नोंदणी होईल आणि ही लस राज्य सरकारकडून दिली जाईल.
करोना लसीसाठी नोंदणी करायची असल्यास पोस्ट ऑफिसमध्ये सोबत काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन जावी लागतील. आपल्यासह फोटो ओळखपत्र आणि मोबाईल घेऊन जा. ओटीपी मोबाईल फोनवरच येईल, ज्याद्वारे नोंदणी करता येते. पोस्ट ऑफिसचे कर्मचारी मोबाईल App द्वारे बीओ-को-विन सीएससी प्रोग्राम चालवतील आणि लसीसाठी नोंदणी करतील. यासाठी पोस्ट ऑफिसमधून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. सामान्य लोक या सुविधेचा लाभ मोफत घेऊ शकतील.





