चिंताजनक! युरोपीयन देशात पुन्हा फोफावतोय करोना; जर्मनीत “लाॅकडाऊन’ जाहीर

बर्लिन – जर्मन सरकार आणि येथील आरोग्यव्यवस्थेवर देखरेख ठेवणारी मुख्य संस्था 27 डिसेंबरला करोनाच्या लशीला परवानगी देण्याची शक्यता आहे. मात्र लसीकरणाला सुरुवात होण्याआधी युरोपीयन देशातील परिस्थिती बिघडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच जर्मनीने सर्व दुकाने, शाळा आणि अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश नसलेल्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने जर्मनीमध्ये बुधवारपासून लॉकडाउनचे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जर्मनीमध्ये आतापर्यंत 23 हजार 427 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
ऑक्टोबरमध्ये करोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर जर्मनीत काही प्रमाणात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. मात्र आता रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने लॉकडाउनचे नियम कठोर करण्यात आले. जर्मनीबरोबरच इटली आणि स्पेनमध्येही करोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे.
नेदरलॅंड्समध्येही पाच आठवड्यांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मार्क रुट यांनी यासंदर्भातील घोषणा केली असून सध्या तरी करोनावर परिणामकारक उपाय दिसत नसल्याने लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे.
19 जानेवारीपर्यंत कोणत्याही प्रकारची सूट मिळण्याची अपेक्षा ठेऊ नये, असेही सराकरकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, नेदरलॅंड्स सरकार 24 ते 25 डिसेंबर म्हणजेच नाताळाच्या काळात काही सूट देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सौदी अरेबियात लसीकरण सुरु
सौदी अरेबियाने गुरुवारपासून लसीकरणाला सुरुवात केली आहे. पहिली लस देशाचे आरोग्य मंत्री डॉ. तौफीक अळ रबिह यांना देण्यात आली. सौदीच्या आरोग्य मंत्रालयाने देशामध्ये गुरुवारपासून लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. सौदीमध्ये आतापर्यंत करोनाचे तीन लाख 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.
तर देशातील सहा हजारहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. हे लसीकरण म्हणजे एका मोठ्या संकटाला संपवण्याची सुरुवात आहे, असे मत लस घेतल्यानंतर डॉ. तौफीक यांनी व्यक्त केले. आतापर्यंत अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, बहरीन, रशिया या देशांमध्ये लसीकरणास सुरुवात झाली आहे.





