corona vaccine : पुणे ग्रामीणमध्ये लसीकरणाचा वेग पुन्हा वाढला

पुणे -करोनाची तिसरी लाट सुरू झाली आणि मागील दोन महिन्यांपासून लसीकरणाचा मंदावलेला वेग पुन्हा वाढू लागला आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये आतापर्यंत 64 लाख 33 हजार 382 लसीचे डोस देण्यात आले आहे. त्यामध्ये सप्टेंबर 2021 मध्ये सर्वाधिक 9 लाख 21 हजार लसीचे डोस देण्यात आले आहे.
टप्याटप्याने सुरू झालेल्या लसीकरणाला वेग करोनाची दुसरी लाट आल्यानंतर मिळाला. जानेवारी 2021 मध्ये सुरवातीला केवळ 12 हजार 782 जणांना लस देण्यात आली. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपुढील आजारी व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले. तसेच करोनाची दुसरी लाटही फेब्रुवारी 2021 अखेरपासून सुरू झाली.
सप्टेंबर 2021 मध्ये सर्वाधिक एका महिन्यातील 9 लाख 21 हजार 453 जणांचे लसीकरण झाले. मात्र, दुसरी लाट ओसरल्यामुळे लसीकरणाचा वेग पुन्हा मंदावला. 9 लाखावरून थेट 5 ते 6 लाखापर्यंत लसीकरणाचा वेग खाली आला.
मात्र, जानेवारी 2022 मध्ये पुन्हा करोनाची तिसरी लाट सुरू झाल्यामुळे लसीकरणाला गती मिळत आहे. जानेवारीच्या पहिल्या दहा दिवसांत 3 लाख 23 हजार 805 जणांना लसीचे डोस देण्यात आले आहे.
ग्रामीणमधील महिनानिहाय लसीकरण
जानेवारी – 12,782, फेब्रुवारी – 48,242, मार्च – 2,42,086, एप्रिल – 7,00,636, मे – 2,06,435, जून – 4,44,137, जुलै – 6,77,076, ऑगस्ट – 7,67,844, सप्टेंबर – 9,21,453, ऑक्टोबर – 7,71,110, नोव्हेंबर – 5,42,919, डिसेंबर – 7,45,063, जानेवारी (2022) – 3,23,805





