corona vaccine : मुलांसाठी स्वतंत्र पाच लसीकरण केंद्र

पुणे -करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेदरम्यान तीन जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी स्वतंत्र पाच लसीकरण केंद्र उभारण्यात आले असून यासाठी महापालिकेने संपूर्ण तयारी केली आहे.
हडपसर येथील महंमदवाडी मधील कै. दशरथ बळीराम भानगिरे दवाखाना, मंगळवारपेठेतील कमला नेहरू रुग्णालय, कोथरूड येथील कै. जयाबाई नानासाहेब सुतार रुग्णालय, येरवडा येथील भारतरत्न स्व. राजीव गांधी रुग्णालय, वडगाव खुर्द येथील कै. मुरलीधर लायगुडे दवाखाना येथे ही व्यवस्था करण्यात आली आहे. या पाच केंद्रांवर मुलांना केवळ कोव्हॅक्सीनचेच डोस मिळणार आहेत.
लसीकरणासाठी ऍपवर नोंदणी एक जानेवारी 2022ला सकाळपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच 50 टक्के लसीकरण ऑफलाइन आणि 50 टक्के ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर जाऊन ऑन दि स्पॉट नोंदणी करून लस घेता येऊ शकणार आहे.
लसीकरणावेळी लाभार्थ्यांकडे आधारकार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे, असे महापालिकेचे लसीकरण विभागप्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.
यानंतर दि. 10 जानेवारी 2022 पासून वय वर्षे 60 आणि त्यापुढील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे, त्याचेही नियोजन करण्यात येणार असून, ते मोहीम सुरू होण्याच्या दोन दिवस आधी जाहीर केले जाणार आहे, असे डॉ. देवकर यांनी स्पष्ट केले.





