खूशखबर : जानेवारीपासून लसीकरण

पुणे – कोरोनाची लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. लस उत्पादक कंपन्यादेखील लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. इंग्लंडमध्ये कोरोना लशीचा आपत्कालीन वापर सुरू झाल्यानंतर भारतातही तीन औषध कंपन्यांनी आपल्या कोरोना लशीला आपात्कालीन मंजुरी मिळावी यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. सीरमनं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनका कंपनीसह मिळून ही लस तयार केली आहे. लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी द्यावी यासाठी ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे अर्ज केला आहे. याच वर्षाच्या अखेरपर्यंत ही मंजुरी मिळेल आणि पुढील वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोरोना लशीकरण सुरू होईल अशी खूशखबर अदर पूनावाला यांनी दिली आहे.
सरकारी, तसंच खासगी क्षेत्रालाही पुरतील एवढ्या डोसची निर्मिती करण्याची तयारी सीरम इन्स्टिट्यूट करत असल्याचं पूनावालांनी स्पष्ट केलं. तसंच, कोविड-19 लशीच्या निर्मितीसाठी नोव्हावॅक्स कंपनीसोबत करार केल्याचंही त्यांनी सांगितलं. 2021च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत नोव्हाव्हॅक्सच्या तिस-या टप्प्यातल्या चाचण्या पूर्ण होण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने विकसित केलेली कोरोना प्रतिबंधक लस तातडीने वापरण्याची परवानगी डिसेंबरअखेरपर्यंत मिळण्याबद्दल संस्थेचे सीईओ आदर पूनावाला आशावादी आहेत. ‘आम्हाला इमर्जन्सी लायसेन्स चालू महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल; पण लशीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठीची परवानगी नंतर मिळेल. नियंत्रक यंत्रणेची परवानगी मिळाली, तर भारताचा कोरोना लशीकरण कार्यक्रम जानेवारी 2021 मध्ये सुरू होऊ शकतो, असा विश्वास आम्हाला आहे’, असं पूनावाला यांनी सांगितलं.
सुरुवातीला देशाच्या किमान 20 ते 30 टक्के लोकसंख्येला लस देण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्रालय नियोजन करत आहे. तेवढा टप्पा पार पडल्यावर आपल्याला समाजात आत्मविश्वास दिसू लागेल, असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. सरकारला जुलै 2021 पर्यंत लशीचे 30 ते 40 कोटी डोस हवे असल्याचंही पूनावाला यांनी नमूद केले आहे





