करोनाने शिकवले आरोग्यासाठी जैवविविधतेचे महत्त्व

पुणे – करोना विषाणूने पर्यावरण आणि आरोग्य यांच्यामधील परस्परसंबंध पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. करोनासारखा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच कॅन्सर, मधुमेह यासारख्या अनेक शारीरिक व्याधींवर उपचार करण्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी पर्यावरण आणि पर्यायाने जैवविविधतेचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे याची पुन्हा एकदा जाणीव सद्यपरिस्थितीमुळे होत आहे.
आरोग्य आणि जैवविविधता यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. जैवविविधतेचे प्रमुख घटक म्हणजे हवा, पाणी, जंगल आणि वन्यजीव. जागतिक संस्थेच्या अभ्यासानुसार, जगभरात विविध रोगांवरील औषधांमध्ये औषधी वनस्पतींचा वापर होतो. तसेच प्राणी-पक्षी यांमधील काही घटकही औषधनिर्मितीसाठी अतिशय उपयुक्त असतात. कॅन्सरसारख्या आजारांवरील औषधात नैसर्गिक घटकांचे प्रमाण 70 टक्क्यांहून अधिक असते.
मात्र, वन्यप्राण्यांची तस्करी, वृक्षतोड, प्रदूषण या माध्यमातून गेल्या काही वर्षात पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. विविध विकास प्रकल्पांमुळे स्थानिक जैवविविधता धोक्यात आली आहे. एकीकडे प्रदूषित हवा, पाण्यामुळे मणसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन, त्यांची प्रतीकारशक्ती कमी होत आहे. तर दुसरीकडे जंगलांच्या ऱ्हासामुळे अनेक औषधी आणि इतर उपयुक्त वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वन्यप्राण्यांची अवैध तस्करी करून त्यांचा खाण्यासाठी, औषध निर्मितीसाठी उपयोग केल्याने, अनेक वन्यप्राण्यांची प्रजाती संपुष्टात आल्या आहेत.
घटत्या जैवविविधतेमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते आणि त्याचा परिणाम साहजिकपणे आपल्या आरोग्यावर होतो. विविध आरोग्य संघटनांकडील नोंदीनुसार, जगभरात श्वसनाचे विकार, त्वचेचे विकार, दूषित पाणी पिल्याने आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड असून, त्यामधील मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे. त्यामुळेच निरोगी आरोग्यासाठी जैवविविधतेचे रक्षण करत, पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे.





