Corona: चीननंतर रशियाची राजधानी ‘मॉस्को’त लाॅकडाऊन; कोविडमुळे 24 तासात 1,159 जणांचा मृत्यू

मॉस्को – करोना रुग्णांची आणि करोना बळींची संख्या झपाट्याने वाढायला लागल्यामुळे रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आजपासून लॉकडाऊनला सुरूवात करण्यात आली. गेल्या 24 तासात एकूण 1,159 जणांचा मृत्यू झाला असल्याचे रशियातील करोना टास्क फोर्सने म्हटले आहे.
करोनाची साथ सुरू झाल्यापासून ही एकाच दिवसातील सर्वात जास्त मृतांची आकडेवारी आहे. रशियात आतापर्यंत 2 लाख 35 हजार 57 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाचे दैनंदिन रुग्ण 40 हजारांच्या संख्येने सापडत आहेत. दरम्यान, रुग्ण वाढत असल्याने चीनमधील काही शहरांमध्ये लाॅकडाऊन लागू करण्यात आले आहे.
करोनाची साथ संथगतीने पुन्हा पसरायला लागल्यामुळे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी 30 ऑक्टोबर पासून 7 नोव्हेंबर पर्यंत देशभर पगारी सुटी जाहीर केली आहे. याकाळात देशातील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये बंद राहणार आहेत. मात्र ज्या बागांमध्ये अधिक संसर्ग आहे त्या बागांनी हा लॉकडाऊन आगोदरच सुरू करावा असे आवाहनही पुतीन यांनी केले आहे. तसेच नागरिकांनी “वर्क फ्रॉम होम’ सुरू करावे, असेही पुतीन यांनी म्हटले आहे.
राजधानी मऑस्कोमध्ये बालवाड्या, शाळा, व्यायामशाळा, मनोरंजनाची ठिकाणे, बहुतेक दुकाने आजपासून बंद झाली. तर हॉटेलांमधून केवळ पार्सलची सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे.





