#CORONA : आता खबरदारी आवश्यकच

पुणे – राज्यात करोना विषाणू दुबईहून मुंबईमार्गे पुण्यात आला आहे. त्यामुळे आता या विषाणुचा प्रादुर्भाव वाढू न देण्यासाठी खबरदारी हाच एकमेच पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे. त्यामुळे श्वसन आणि हात धुण्याबाबत शिष्टाचार पाळून प्रतिबंध करणे सहज शक्य आहे.
केवळ 5 टक्के संशयितांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासते. तर 85 टक्के जनतेला औषधोपचाराची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये. या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे खबरदारी घ्यावी.
हे करा
– नाका-तोंडाला रूमाल किंवा मास्क लावावे.
– सर्दी, खोकला असल्यास रुमालाचा वापर करावा, रुमाल नसेल तर स्वत:च्या शर्टच्या बाहीचा वापर करावा.
– वापरलेला रुमाल अथवा कपडे साबणाने स्वच्छ धुवावे.
– हात वारंवार स्वच्छ पाण्याने धुवावेत.
– खोकला किंवा शिकल्यानंतर रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर स्वयंपाक, जेवणाअधी आणि नंतर, शौचालयाला जाऊन आल्यावर, प्राणी किंवा प्राण्याच्या विष्ठेशी संपर्क आल्यानंतर हात धुवावेत.
– सर्दी, खोकला व तापाची लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.
– Triple layer surgical maskकेवळ संशयित रुग्ण व संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी वापरावा.
– N95 मास्क सांसर्गिक उपचार रुग्णालयातील डॉक्टर व इतर निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वापरावा.
हे करू नका
– आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हस्तांदोलन टाळावे.
– वैयक्तिक वापरलेला हातरूमाल इतरांना देऊ नये.
– वारंवार चेहऱ्याला हात लाऊ नये.
– गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
– सर्दी व तापाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींनी इतर व्यक्तींपासून किमान एक मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवावे.
– ओल्या जागा उदा. खिडकी, स्वयंपाक घर, शौचालय, स्नानगृह कोरडे ठेवावे.
– ओल्या जागेस वारंवार स्पर्श करू नये.
डॉ. नायडू रुग्णालयातील गर्दी ओसरली..
करोनाची बाधा झालेले दोन रुग्ण आढळल्याने महापालिकेचे डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. चीनमध्ये करोनाच्या साथीने थैमान घातल्याने जानेवारीत परदेशातून आलेल्या अनेक नागरिकांनी डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी केली होती. मात्र, मंगळवारी दोन रुग्ण डॉ. नायडू रुग्णालयात असल्याची माहिती समोर येताच, येथे तपासणीसाठी येणाऱ्यांची गर्दीच ओसरली आहे. नायडू रुग्णालयात दररोज 15 ते 20 जण तपासणीसाठी येतात. मात्र, मंगळवारी दुपारपर्यंत कोणीच फिरकले नसल्याचे येथील डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये जागृती करा
करोना प्रसार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करा. आजारी विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याचे टाळावे, असे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी राज्यातील सर्व शिक्षण अधिकारी, शिक्षकांना यांना दिले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत येताना मास्कची सक्ती करण्यात येऊ नये, असेही आदेशात म्हटले आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने पाठविलेल्या पत्राची दखल घेऊन शिक्षण आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
एस.टी. आगारांत जनजागृती
करोनाचे वाढते संक्रमण टाळण्यासाठी एसटी स्थानकांवर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत स्थानकांमध्ये उद्घोषणा, सोशल मीडियावरून जनजागृती केली जात आहे. एस.टी स्थानकातील उद्घोषणा यंत्रणेतून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, खोकताना-शिंकताना तोंडावर रुमाल लावा, सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयात जावा, हस्तांदोलन टाळा असे संदेश देण्यात येत आहेत. राज्यात सुमारे 600 पैकी 550 वापरात असलेली बस स्थानके, प्रसाधनगृह आणि एसटी परिसरात स्वच्छता राखावी. प्रसाधनगृहांची स्वच्छता करताना जंतूनाशकांचा वापर करावा, अशा सूचना एसटी महामंडळाने आगारांना दिलेल्या आहे. स्थानकांसह आगार, कार्यशाळा या सर्व ठिकाणी करोना बचावासाठी 7 कलमी उपाययोजना राबवण्याचे आदेश राज्यभरातील एसटी मुख्यालयातून विभाग नियंत्रकांना आहेत.
शाळांकडून सूचना जारी
करोना रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून सर्व शाळांचे मुख्याध्यापक व व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांसाठी सूचना देणे सुरू केले आहे. विद्यार्थी आजारी असल्यास त्याला शाळेतच पाठवू नका. विद्यार्थी आणि पालकांनी त्याची अंमलबजावणी करावी, असे सूचनांमध्ये म्हटले आहे.
परदेश दौरे रद्द करावेत
जगभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना, सध्याही ट्रॅव्हल्स एजन्सी, कंपन्यांसह वैयक्तिक सहलींचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, याचा फटका आता महाराष्ट्रालाही बसला आहे. दुबईहून सहल करून पुण्यात आलेल्या दोघांना आणि संपर्कातील तिघांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे सहली प्रादुर्भाव वाढवत आहेत. त्यामुळे सहलींचे नियोजन रद्द करणे हाच एकमेव पर्याय आहे.
11 वर्षांनंतर नायडू रुग्णालय पुन्हा चर्चेत
महापालिकेचे डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. जून 2009 मध्ये शहरात स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर या साथीने सुमारे हजारहून अधिक लोकांचा बळी गेला होता. तसेच 10 ते 15 हजारांवर अधिक नागरिकांना याचा संसर्ग झाला. त्यामुळे हे रुग्णालय चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, त्यानंतर आता पुन्हा करोनामुळे हे रुग्णालय चर्चेत आले आहे.





