औषध बाजारात करोनाचा शिरकाव

दोन ते तीन व्यापाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना लागण
पुणे – शहराला औषध पुरवठा करणाऱ्या सदाशिव पेठेत करोनाने शिरकाव केला आहे. येथील औषध बाजारातील दोन ते तीन व्यापाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. त्यामुळे काळजी म्हणून येत्या शुक्रवारपासून तीन दिवस (दि. 15 ते 17) औषध बाजार बंद ठेवण्याचा निर्णय केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टने (सीएपीडी) घेतला आहे. तर किरकोळ औषध विक्री सुरूच राहणार आहे.
शहरातील विविध भागांतील किरकोळ औषध विक्रेत्यांना औषधाचा पुरवठा करणारी बाजारपेठ म्हणून सदाशिव पेठेतील घाऊक औषध बाजाराकडे पाहिले जाते. याच ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत किरकोळ, घाऊक विक्रेते, डिलिव्हरी बॉईज, तसेच औषध दुकानातील कर्मचारी यांची गर्दी होत असते. अशा परिस्थितीत गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, लागण झालेल्यांमध्ये घाऊक व्यापाऱ्यांसह दुकानातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे अन्य व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिवाय, अन्य औषध विक्रेत्यांसह कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये. तसेच, सदाशिव पेठेत दाट लोकवस्ती आहे. त्याचा विचार करून आम्ही सर्व घाऊक विक्रेत्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून औषध बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन दिवसात घाऊक व्यापारी, कर्मचारी दुकानात उपस्थित राहणार नाहीत. त्या दरम्यान दुकानांचे निर्जंतुकीकरण होणार आहे, अशी माहिती सीएपीडीचे सचिव अनिल बेलकर यांनी दिली.
आवश्यक साठा ठेवा
कोणत्याही प्रकारच्या औषधांचा तुटवडा होऊ नये यासाठी किरकोळ औषध विक्रेत्यांनी पुढील तीन दिवसांकरिता आवश्यक साठा खरेदी करून ठेवावा. एकमेकांना लागणारी औषधे देऊन घेऊन पुरवठा सुरळीत ठेवावा. कोणत्याही रुग्ण आणि ग्राहकाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेणे बंधनकारक आहे, असे आवाहन सीएपीडीचे सचिव अनिल बेलकर यांनी केले.





