एसआरपीएफच्या तीन जवानांना करोना संसर्ग

भीतीचे वातावरण : राज्य राखीव दलही असुरक्षित
पुणे – रामटेकडी येथील एसआरपीएफ (राज्य राखीव पोलीस दल) ग्रुप दोनची 100 जवानांची तुकडी मुंबईत कोरोना संचारबंदीच्या बंदोबस्तासाठी गेली होती. दीड महिन्यांच्या ड्युटीनंतर परतलेल्या तुकडीतील तीन जवानांना करोना संसर्ग झाला आहे. मुंबईत सर्वांना एकाच हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. करोना संसर्गानंतरही जवानांची तपासणी किंवा त्यांचे विलगीकरण केले नाही. त्यामुळे जवानांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असे सांगण्यात आहे.
हे जवान मुंबईत गेल्यानंतर त्यांना विभागून भेंडीबाजार, डोंगरी, येरवली आणि वरळ भागात बंदोबस्त देण्यात आला होता. हे जवान दीड महिना येथे तैनात होते. ते सोमवारी परतल्यानंतर त्या सर्वांना येथील एकाच “अलंकार’ हॉलमध्ये ठेवण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, मंगळवारी 14 जणांची करोनाची टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये दोघांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मात्र या सर्वांचे विलगीकरण करून वेगवेगळे ठेवणे अपेक्षित होते. परंतु, वरिष्ठांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. 24 तासानंतरही हे जवान “अलंकार’ हॉलमध्येच होते. तेथे जवानांना आंघोळीसाठी एकच नळ असून सर्वांची खानावळही एकच आहे. “बुधवारी 6 जणांची करोना टेस्ट करण्यात आली. त्यात आणखी एकाला लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वरिष्ठांना ही माहिती देऊनदेखील अद्याप आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी नेले नसून काहीच उपाययोजना करण्यात येत नाही,’ असे येथील एका जवानाने सांगितले आहे.
मुंबईतून सोमवारी जवानांची तुकडी शहरात आल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामधे तुकडीतील तिघांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनतर सर्वच जवानांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. जवानांना एकाच हॉलमध्ये ठेवलेले नाही. त्यांची काळजी घेण्यात येत आहे.
– रामकुमार, एसआरपीएफ ग्रुप दोन, प्रमुख





