शिक्रापुरातील बँक कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा

शिक्रापुरातील रहिवासी हडपसरमधील बँकेचा कर्मचारी
शिक्रापूर (प्रतिनिधी) : सर्वत्र कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरात एकामागे एक असे अनेक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते. त्यांनतर पाच दिवसापूर्वी एक कंपनी कामगार कोरोना बाधित असल्याचे समोर आले असताना, मंगळवारी एक आणि आता आज पुन्हा एका बँकेचा कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे समोर आले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिक्रापूर मध्ये तीन दिवसात पाच कोरोना रुग्ण आढळून आल्याने शिक्रापूर सह आजूबाजूचा परिसर हादरून गेला असून नागरिक भयभीत झाले आहे. शिक्रापूर ता. शिरूर येथील मलठण फाटा परिसरात राहणारा रांजणगाव गणपती येथे एका नामांकित कंपनीमध्ये कामाला असलेला चाळीस वर्षीय इसम २७ जून रोजी कोरोना बाधित असल्याचे समोर आले. त्यांनतर त्याच कंपनी कामगाराचा आठ वर्षाचा मुलगा कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे. आज शिक्रापूर येथील राऊतवाडी येथे राहणारा आणि हडपसर येथे एका कंपनीमध्ये नोकरीला असलेला पंचवीस वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सदर युवक कामाला असलेल्या बँकेतील काही कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आलेली असताना यापैकी अकरा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये शिक्रापूर येथील सदर कंपनी कामगाराचा समावेश आहे.
शिक्रापूर येथील सदर बँक कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या विभागाचे आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचारी यांसह आदींनी सदर रुग्णाच्या घरा जवळील सर्व परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने औषध फवारणी करत निर्जंतुकीकरण केले आहे. तर सदर बँक कर्मचाऱ्याच्या संपर्कात असलेल्या त्याच्या आई, वडील, भाऊ व त्याच्या सोबत हडपसर येथे कामाला जाणाऱ्या त्याच्या एका मित्राचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहे. तसेच त्या कामगाराच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांची माहिती संकलित करण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. काही दिवस कोरोना पासून मुक्ती मिळाल्याने शिक्रापूर व परिसरातील नागरिक समाधानी असताना आता पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने शिक्रापूर सह परिसर हादरून गेला आहे.
ग्रामीण भागाला शहराचे स्वरूप ……
महाराष्ट्रामध्ये पुणे व मुंबई शहरामध्ये जास्त प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना ग्रामीण भाग कितीतरी मोकळा होता. परंतु आता ग्रामीण भागामध्ये कोरोणाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होऊ लागला असल्याने जलद गतीने जास्तीत जास्त रुग्ण ग्रामीण भागात आढळून येत असल्याने ग्रामीण भागाला देखील शहराचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे.





