जगात आतापर्यंत 84 लाख लोकांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : कोरोना बाधितांची संख्या संपूर्ण जगभरात झपाट्याने वाढत आहे. जगात कोरोना बाधितांची संख्या आता 84 लाखांवर पोहोचली आहे. तर साडे चार लाख लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 83 लाख 92 हजार 582 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 50 हजार 452 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 44 लाख लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोना बाधित फक्त 8 देशांमध्ये आहेत.
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेमध्ये दिसून येतो. अमेरिकेमध्ये 22 लाखांहून अधिक लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर एक लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आता दरदिवशी ब्राझीलमध्ये अमेरिकेहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तसेच दरदिवशी सर्वाधिक मृतांची नोंदही ब्राझीलमध्ये करण्यात येत आहे. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे.
ब्राझील, रशिया, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथ एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. चार देश (अमेरिका, ब्राजील, ब्रिटेन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.20 लाखांवर पोहोचला आहे. चीन टॉप-18 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. तर भारताचा समावेश टॉप-4 कोरोना बाधित देशांमध्ये झाला आहे.





