हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगला रग्बी सामना

करोनामुक्त न्यूझीलंडमध्ये स्पर्धांना प्रारंभ
वेलिंग्टन – जगभरात हाहाकार उडवलेल्या करोनावर यशस्वीपणे मात करत न्यूझीलंडमध्ये क्रीडा स्पर्धांना प्रारंभदेखील झाला असून हजारो प्रेक्षकांना प्रत्यक्ष मैदानात उपस्थित राहण्याचीही परवानगी दिली गेली. याच प्रेक्षकांच्या उपस्थितीत बुधवारी येथे रग्बीचा सामना रंगला.
डुनेडीन हायलॅंडर्स आणि चिफ्स या स्थानिक क्लबमध्ये बुधवारी जवळपास 25 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामना खेळवण्यात आला. या सामन्याचा आनंद लुटताना प्रेक्षकांनी न्यूझीलंड रग्बी युनियनचे आभार मानताना खेळाडूंना प्रोत्साहन दिले. जवळपास तीन महिन्यांनी प्रेक्षकांचा गलका ऐकल्यानंतर खेळाडूंनीदेखील सामना पार पडल्यानंतर मैदानावर जल्लोष केला व चाहत्यांचे आभार मानले.
या सामन्यातील अनुभवाच्या जोरावर आता दुसरा सामनाही खेळविण्यात येणार असून त्यासाठी 30 हजार प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे. योग्य नियोजन, सर्व देशवासीयांचा पाठिंबा, सरकारी आदेशांचे तंतोतंत पालन केले गेले तर करोनावर यशस्वीपणे मात करता येते हेच न्यूझीलंडने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. 30 एप्रिलनंतर देशात एकही करोनाबाधित आढळलेला नसल्याने हा देश केवळ दोन महिन्यांतच करोनामुक्त बनला आहे.





