सीरियातील निर्वासितांच्या शिबिरातही करोनाचा शिरकाव

अम्मान (जॉर्डन) – सीरियातील शरणार्थ्यांसाठी जॉर्डनमध्ये सुरू करण्यात आलेल्या शिबिरामध्येही करोना रोगाचा शिरकाव झाला असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क विषयक आयोगाने म्हटले आहे.
आझराक येथील शरणार्थ्यांच्या शिबिरातील दोघाजणांना करोनाची बाधा झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. सीरियातील शरणार्थ्यांच्या या शिबिरात करोनाचा संसर्ग झाल्याचे प्रथमच निदर्शनास आले आहे. यादवी युद्धामुळे सीरियातून विस्थापित झालेले तब्बल 1 लाख नागरिक या शिबिरामध्ये रहात आहेत.
करोनाची लागण झालेल्या दोन्ही रुग्णांना विलगीकरण केंद्रात हलवले गेले आहे आणि त्यांच्या शेजारील व्यक्तींनाही दुसरीकडे हलवून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.
अझराक येथे सीरियातील 36 हजार निर्वासित असून झातारी येथील निर्वासितांच्या शिबिरामध्ये 76 हजार शरणार्थींनी आश्रय घेतला आहे. जॉर्डनमध्ये सीरियाचे साडे 6 लाखांपेक्षा अधिक शरणार्थी आहेत.





