#corona : 95 वर्षीय आजीने केली कोरोनावर यशस्वी मात

पारगाव -करोनाच्या कहरात कित्येक तरुणांना मृत्यूला सामोरे जावे लागले. मात्र, पारगाव येथील राजाराम बोत्रे यांच्या मातोश्री 95 वर्षीय दरुबाई दत्तात्रय बोत्रे यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर करोनावर मात केली आहे.
आठ दिवसांपूर्वी आजींना त्रास होऊ लागल्याने त्यांचे नातू प्रदीप व संदीप बोत्रे यांनी आजींना केडगाव येथील, डॉ. भरत खळदकर यांच्या मयुरेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. खळदकर यांनी त्यांची चाचणी केली. करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.
त्यावेळी डॉ. खळदकर यांनी आजीवर उपचार सुरू केले. आजींचा स्कोअर 11 वर होता. वयोमानानुसार आजीवर उपचार करणे डॉक्टरांपुढे आव्हान होते. मात्र, डॉ. खळदकर यांनी आठ दिवस उपचार केल्यानंतर आजी ठणठणीत बरी होऊन घरी परतल्या.
घरी आल्यानंतर आजींनी पूर्वी प्रमाणे आपली दिनचर्या सुरू केल्याने बोत्रे कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. बोत्रे कुटुंबीयांनी डॉ. खळदकर यांचे आभार मानले.





