कॉर्डलाइनची चाचणी यशस्वी

दौंड जंक्‍शनवरील प्रवाशांचा ताण कमी होणार : वेळेची बचत

दौंड – दौंड रेल्वे जंक्‍शनच्याअगोदर नगर व मनमाडकडे जाण्यासाठी कॉर्डलाइनची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचा वेळ वाचणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या कामाच्या प्रतीक्षेत प्रवासी होते. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे आता दौंड जंक्‍शनवरील वाढता ताण काहीअंशी कमी होणार आहे.

पुणे – दौंड लोहमार्गावरून मनमाडकडे जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कॉर्डलाइनचे काम पूर्ण झाले आहे. या लोहमार्गाची आज विशेष रेल्वे गाडीने चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचा प्रशासनाचा अहवाल मिळाल्यानंतर या लोहमार्गावरून प्रथम रेल्वे माल गाड्या सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

पुणे येथून मनमाडकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना दौंड येथे थांबा आहे. येथून रेल्वे इंजिन बदलून या रेल्वे गाड्या पुन्हा अहमदनगर, मनमाडकडे रवाना होतात. इंजिन बदलण्याच्या प्रक्रियेसाठी दौंड रेल्वे स्थानकावर साधारण तीस मिनिटांचा कालावधी लागतो. या कॉर्डलाइनमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच दौंड जंक्‍शनवरील ताण कमी होणार आहे. या कॉर्डलाइनला 2017 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर हे काम प्रगतीपथावर सुरू होते. कॉर्डलाइनची लांबी बाराशे मीटर आहे. यासाठी अडीच हेक्‍टर जमीन रेल्वे बोर्डाने संपादित केली आहे. कॉर्ड लाइनसाठी साधारण 29 कोटी रुपये खर्च झाला आहे. या कॉर्डलाइनलगत आगामी काळात प्लॅटफॉर्म, पादचारी पूल, रस्ता, यासह इतर सुविधा उपलब्ध होणार आहे.

यावेळी रेल्वेचे सुरक्षा आयुक्त ए. के .जैन, सुरक्षा उपआयुक्‍त जी. पी. गर्ग, मुख्य प्रशाकीय अधिकारी मनोज शर्मा, मुख्य कर्षण अभियंता अश्‍विनी सक्‍सेना, सोलापूर डीआरएम हितेंद्र मल्होत्रा, पुणे डीआरएम मिलींद देऊस्कर, मुख्य इलेक्‍ट्रीकल इंजिनिअर (दक्षिण) आर. के. मिश्रा, सिग्नल व दूससंचार अभियंता अश्‍विन शुक्‍ला, मुख्य इलेक्‍ट्रीक इंजिनिअर आर. बी. देशमुख, सिग्नल व दूरसंचार एस. के. विश्‍वास, दौंड रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक सेमुएल क्‍लिफ्टन, यातायात निरीक्षक आर. बी. सिंह उपस्थित होते.

500 कामगार कामावर
दौंड- मनमाड लोहमार्गावर मंगळवार (दि.10) ते शनिवार (दि.14) दरम्यान रोज साधारण साडेतीन तास ब्लॉक घेण्यात आला होता. यादरम्यान या लोहमार्गावर साधारण 30 स्टेशन मास्तर, अधिकारी यासह 500 पेक्षा जास्त कामगार दिवसरात्र काम करीत होते. सध्या लोहमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. पुण्यावरून उत्तरेकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांना दौंड जंक्‍शनमध्ये 45 मिनिटे इंजिन बदलण्याच्या कारणास्तव थांबावेच लागत होते. सध्या पाटस रेल्वे स्थानकापासून दौंड जंक्‍शनच्याआधी मालू स्लीपर कारखान्याजवळून बाह्यवळण (कॉर्डलाइन)चे काम झाले आहे. परिसरातील एकूण 19 शेतकऱ्यांना मोबदला द्यावा लागला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)