सहकार : शाश्वत भविष्यासाठी सहकारी संस्था

– मुरलीधर मोहोळ
नवी दिल्ली येथे अलीकडेच आंतरराष्ट्रीय सहकार आघाडी (आयसीए) जागतिक सहकार परिषद 2024 चे आयोजन करण्यात आले होते. यात 100 हून अधिक देशांचे नेते सहभागी झाले होते.
जागतिक सहकार परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025चा प्रारंभ केला. संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये सहकारी संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका, यावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने हा एक महत्त्वाचा जागतिक उपक्रम आहे. हे वर्ष जागतिक आर्थिक आणि सामाजिक प्रवाहात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, ज्यामध्ये सहकारी संस्थांना केवळ स्थानिक विकासाचे साधन म्हणून नव्हे तर जागतिक आर्थिक विकासात प्रमुख कर्तेधर्ते म्हणून मानण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढेल.
सहकार प्रारूप
सहकार प्रारूपाच्या केंद्रस्थानी एक साधी पण शक्तिशाली संकल्पना आहे ‘परस्पर फायद्यासाठी एकत्र येऊन काम करणारे लोक.’ सामूहिक मालकीवर, सामायिक जबाबदारीवर आणि लोकशाही प्रक्रियेतून निर्णय प्रक्रिया, या तत्त्वांवर सहकार भर देतो. या तत्त्वांमुळे जगभरात शेतीपासून आरोग्यसेवेपर्यंत, वित्तीय सेवांपासून ऊर्जा उत्पादनापर्यंत उल्लेखनीय यश मिळाले आहे.
भारतात, ग्रामीण विकासात सहकारी संस्था महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. अमूल आणि तत्सम सहकारी संस्थांचे यश हे सहकार प्रारूपाच्या आर्थिक विकास आणि सामाजिक न्याय, या दोन्हीला चालना देण्याच्या क्षमतेचा पुरावा आहे. शिवाय, अमूलसारख्या दूध उत्पादक सहकारी संस्था ग्रामीण भागात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला चालना देतात, ज्यामुळे दूध उत्पादक समित्यांशी संबंधित महिलांना त्यांच्या व्यवसाय क्रियाकलापांसाठी सक्षम केले जाते. आपल्या सहकार प्रारूपाच्या माध्यमातून, अशा सहकारी संस्था नेतृत्व भूमिका, कौशल्य विकास आणि आर्थिक सहाय्य देतात, ज्यामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यात साहाय्य होते, समुदाय आणि अर्थव्यवस्थेत त्यांची भूमिका अधिक बळकट होते.
भारताकडून सहकाराला चालना
भारताने खूप आधीच, आर्थिक परिवर्तन आणि सामाजिक प्रगतीचे साधन म्हणून सहकाराचे मूल्य ओळखले आहे. आयसीए जागतिक सहकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे सहकार चळवळीप्रती भारताची खोलवर रुजलेली बांधिलकी अधोरेखित झाली. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 चा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी आपल्या भाषणात, आत्मनिर्भर, समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यात सहकारी संस्थांची भूमिका अधोरेखित केली.
विशेषतः ग्रामीण भारतात, जिथे सहकारी संस्था शेती आणि दुग्धव्यवसाय यासारख्या क्षेत्रांचा कणा असतात तिथे उपेक्षित समुदायांना सक्षम करण्यात सहकार क्षेत्राची क्षमता, यावरही पंतप्रधानांच्या भाषणात प्रकाश टाकण्यात आला. मोदी यांच्या गतिमान नेतृत्वाखाली, भारत सरकारने सहकार क्षेत्र विस्तारण्यात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने उचललेली पावले ही, सहकार हा केवळ भूतकाळाचे मागे उरलेले अवशेष नाहीत तर आर्थिक आणि सामाजिक विकासात तो एक महत्त्वाचा समकालीन दुवा असल्याच्या मान्यतेचे प्रतिबिंब आहे.
सहकार : पुनरुज्जीवनाचा रोडमॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाने भारताच्या सहकारी परिदृश्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भारत डिजिटल अर्थव्यवस्थेच्या मागण्यांशी सुसंगत असलेल्या आधुनिक सहकारी चौकटीकडे वाटचाल करत आहे.
वाढत्या डिजिटल जगात, सहकारी संस्थांची पोहोच आणि प्रभाव वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा त्यांचा दृष्टिकोन विशेषतः महत्त्वाचा आहे. सहकारी संस्थांचे भविष्य, बदलत्या काळासोबत विकसित होण्याची त्यांची क्षमता, कार्यक्षमता आणि शाश्वतता सुधारण्यासाठी आधुनिक साधनांशी जोडून घेण्यावर, अवलंबून आहे.
जागतिक कार्यक्रम
आज अनेक राष्ट्रे आर्थिक असमानता, हवामान बदल आणि सामाजिक अशांतता अशा आव्हानांना तोंड देत असताना सहकार उत्तम पर्याय पुरवतो. विकासाचे असे प्रारूप जे समावेशक, लोकशाही आणि लवचिक आहे. एकता, परस्पर साहाय्य आणि लोकशाही सहभागावर भर देणारे सहकार प्रारूप जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी उत्तम मार्ग दर्शवते.
नफ्यापेक्षा लोकांना प्राधान्य देणारी चौकट प्रदान करून, सहकारी संस्था आर्थिक क्रियाकलापांचे फायदे अधिक व्यापकपणे वितरित होण्याची सुनिश्चिती करतात, वंचितांना सक्षम करतात आणि सामाजिक दरी भरण्यास मदत करतात. शाश्वत विकास उद्दिष्टांशी सहकारी चळवळ जोडून, भारताने शाश्वत आणि समावेशक विकासासाठी जागतिक समर्थक म्हणून स्वतःला स्थापित केले आहे. थोडक्यात, समावेशक आणि शाश्वत जागतिक अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी सहकारी संस्था गुरूकिल्ली आहे.
पुढील वाटचाल : सहकारी भविष्य
सहकार हे केवळ आर्थिक साधन नाही तर सामाजिक न्याय, आर्थिक समता आणि पर्यावरणीय शाश्वतता साध्य करण्याचे ते एक शक्तिशाली साधन आहे. ‘सहकार से समृद्धी’ हा मंत्र 140 कोटी लोकांच्या आपल्या देशाचे चांगले भविष्य घडवू शकते. सामाजिक आणि आर्थिक विकासाचे साधन म्हणून सहकारी संस्थांना प्रोत्साहन देऊन, आपण असे जग निर्माण करू शकतो जिथे समृद्धी निर्माण केली जाईल, असमानता कमी केली जाईल आणि समुदायांना सक्षम केले जाईल. आपल्या जागतिक अर्थव्यवस्थेचे भविष्य सहकार्यावर अवलंबून आहे आणि सर्वांसाठी एक न्याय्य, अधिक शाश्वत जग निर्माण करण्याची गुरूकिल्ली सहकार क्षेत्राकडे आहे, हे ओळखण्याची वेळ आली आहे.





