Nagar | कॉंग्रेस पक्षाचा विचार प्रभावीपणे पटवून द्यावा

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- श्रीरामपूर विधानसभा महिला काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांची बैठक आज आमदार लहू कानडे यांच्या कार्यालयात महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष प्रीती जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
आमदार लहू कानडे व श्रीरामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी आ. कानडे, नाईक व जगताप यांच्याहस्ते नूतन महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
आ. कानडे म्हणाले की, प्रत्येक पदाधिकाऱ्याने महिलांचा गट तयार करावा. त्यामाध्यमातून घरोघर महिलांपर्यंत जाऊन प्रचार करावा.
प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचा सर्वधर्मसमभावाचा विचार, महायुतीच्या केंद्रातील भाजप सरकारने जीएसटी व भाववाढीच्या माध्यमातून सुरू ठेवलेली सर्वसामान्य कष्टकरी जनतेची लूट, महाराष्ट्रातील महायुतीच्या भ्रष्ट सरकारचे कारनामे, याबद्दल महिलांमध्ये जागृती निर्माण करावी.
तसेच महिला अत्याचार व महिला सक्षमीकरण याबाबत भाजप सरकारचे उदासीनतेचे धोरण, आपल्याला देण्यात आलेल्या प्रचार साहित्याच्या माध्यमातून प्रभावीपणे पटवून द्यावे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रतिकूल परिस्थिती असतानाही आ. लहू कानडे यांनी जी भरीव कामे केली, त्याची माहिती कार्य अहवालामधून दिली आहे, तेही जनतेला सांगावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
नाईक यांनी आ. कानडे यांच्या कार्यकाळात झालेला नोकरी मेळावा, युवकांना व्यायाम साहित्य, शाळांना एलएफडी, रस्ते, तलाठी कार्यालये अशा विविध विकास कामांची माहिती दिली.
तालुकाध्यक्ष प्रीती जगताप यांनी सांगितले की, आ. कानडे यांनी तालुकाध्यक्षपदाची दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून तालुक्यात महिलांचे संघटन उभे करण्यासाठी जिवाचे रान करू, आ. कानडे यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी शहराबरोबरच ग्रामीण भागात महिलांचे स्वतंत्र दौरे करण्यासाठी नूतन पदाधिकारी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्याध्यक्ष अॅड. पूजा लावरे, रुबिना पठाण, संगीता शिरसाठ, अनिता ढोकणे, ज्योती निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सल्लागार व कायम निमंत्रित सदस्य सुमन कानडे, सुनंदा शेंडे, माजी नगरसेविका जायदाबी कुरेशी, उपाध्यक्ष प्रतिमा पंडित, सरचिटणीस निकिता आसने, लका गोसावी, निशा खंडागळे, जयश्री शेळके, सरपंच शीतल पटारे, लुसिया तपासे, ज्योती जाधव, सचिव चित्रा लाहुंडे, सरपंच नंदा अहिरे, मनीषा शिंदे, शीतल व्यास, सुनंदा शेंडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.





