‘आम्ही सारे सावरकर’, मुख्यमंत्र्यांनी DP बदलत दिले राहुल गांधींना प्रत्युत्तर

मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत वादग्रस्त विधान केल्याने देशभरात वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी भाजप नेत्यांसह अनेक जण राहुल गांधींवर टीका करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये राज्यात सावरकर गौरव यात्रा सुरू करणार असल्याची माहिती दिली.
त्यानंतर आता राहुल गांधींच्या विधानाचा विरोध करत एकनाथ शिंदे यांच्यासह शिवेसेनेच्या (शिंदे गट) नेत्यांनी त्यांचे सोशल मीडियावरचे डीपी बदलले आहेत. यात मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवसेना नेत्यांनी सावरकरांचे फोटो डीपीवर ठेवले आहे. या फोटोवर ‘आम्ही सारे सावरकर’ असे लिहिल्याचे दिसते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली होती. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान राहुल गांधी यांच्याकडून होत आहे. याचा मी निषेध करतो. राहुल गांधी यांनी एक दिवस अंदमान निकोबारच्या जेलमध्ये राहून दाखवावे. राहुल गांधी यांचा निषेध सर्वांनी करायला हवा. तुम्ही म्हणता मी गांधी आहे, सावरकर नाही. तुमची लायकी सुद्धा नाही, सावरकर होण्याची,’ असे शिंदे म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधींना मानहानी प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी “माफी मागायला मी सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे, गांधी कुणाची माफी मागत नाही,” असे म्हंटले होते. यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.





