शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य अन् बैठकीलाही उशीर; अजित पवारांकडून कृषीमंत्री कोकाटेंची कान उघडणी

Ajit Pawar And Manikrao Kokate | कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर अखेर कोकाटे यांना आपल्या वक्तव्याप्रकरणी जाहीरपणे माफी मागावी लागली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी देखील माणिकराव कोकाटेंना खडेबोल सुनावल्याचे वृत्त समोर आले आहे.
अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नियोजित बैठक पार पडली. त्यावेळी माणिकराव कोकाटे हे अर्धा तास उशीरा पोहोचले. तोपर्यंत राष्ट्रवादीचे इतर नेते देवगिरीवर दाखल होऊन बैठकीला सुरुवात झाली होती. त्यामुळे अजित पवार यांनी बैठकीला उशीरा आलेल्या माणिकराव कोकाटे यांना चांगलेच फैलावर घेतले.
प्रसारमाध्यमांसमोर सातत्याने पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्यं करणे, जनता दरबारला पक्ष कार्यालयात हजर न राहणे, यावरून अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना सुनावल्याचे एका वृत्तवाहिनीच्या विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक मंगळवारी मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. प्रत्येकाच्या मतदार संघातील विकास कामांचा आढावा घेतला. निधीअभावी कामं रखडता कामा नये, लोकांची गैरसोय होऊ नये, अशा सूचना केल्या. त्याचप्रमाणे अधिक कार्यक्षम होण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित केले, असे ट्विट अजित पवार यांनी या बैठकीनंतर केले होते.
माणिकराव कोकाटे काय म्हणाले होते?
शेतकरी कर्जमाफी कधी करणार? असा प्रश्न माणिकराव कोकाटे यांना विचारला असता. “तुम्हाला पाईपलाईला, जलसिंचनाला, शेततळ्याला पैसे, शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे. कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक करता का? कर्जमाफीचे पैसे तुम्ही सारखपुडा आणि लग्न कार्यासाठी वापरता,” असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. याच वक्तव्यावरुन अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांना पक्षाला अडचणीत आणतील अशी वक्तव्ये करु नका, अशी समज दिली आहे. Ajit Pawar On Manikrao Kokate |
माणिकराव कोकाटेंनी मागितली माफी
काही दिवसांपूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून शेतकऱ्यांची अनावधानाने आणि मस्करीची कुस्करी झाली. शेतकऱ्यांना सुख-समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना मी करतो,” असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले होते. Ajit Pawar On Manikrao Kokate |
हेही वाचा:
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी आपले म्हणणे मांडा; खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस





