कोरेगावसह राज्यात परिवर्तनासाठी हातभार लावा

कोरेगाव – महायुती सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या निर्धाराला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शरद पवार नावाचे वादळ राज्यात सर्वत्र घोंगावत आहे. कोरेगावातून आमदार शशिकांत शिंदे यांना विजयी करून राज्यात सत्ता परिवर्तनामध्ये हातभार लावावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.
पक्षाची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी सायंकाळी कोरेगाव तालुक्यात दाखल झाली. कोरेगाव शहरात आमदार जयंत पाटील यांच्यासह प्रमुख नेते मंडळींचे आझाद चौकामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. जेसीबीद्वारे पुष्पृष्टी करण्यात आली. त्यानंतर रात्री खेड नांदगिरी येथे जाहीर सभा झाली. या सभेत आमदार जयंत पाटील यांनी आपल्या स्टाईलने भाषण करत विरोधकांवर चारही बाजूंनी टीका केली. व्यासपीठावर खासदार अमोल कोल्हे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, अमित कदम, नवनियुक्त तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे यांच्यासह विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला असला तरी विरोधकांची मताधिक्य कमी करण्यात यश आले असून नियतीच्या मनात वेगळेच होते. कोरेगावातील राक्षसाचा पराभव करण्यासाठी शशिकांत शिंदे यांना विधानसभा निवडणूक लढवावी लागणार होती.
ते नसते तर आज दुसरा उमेदवार कोण होता, असे विचारून शशिकांत शिंदे आता आमदार होतील आणि पुढच्या टर्ममध्ये निश्चितपणे खासदार होतील, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला. खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार महेश शिंदे यांच्या नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली. पन्नास खोके एकदम ओकेचे उदाहरण देत त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. आमदार शशिकांत शिंदे यांनी मतदारसंघात विधायक कामे केली असून त्यांना पुन्हा एकदा मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले की, शिवस्वराज्य यात्रा कोरेगाव मतदारसंघातील परिवर्तनाची नांदी आहे. कार्यकर्त्यांना होणारा त्रास, प्रशासनाकडून मिळणारी हिन वागणूक या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. जेव्हा कधीही महाराष्ट्रावर संकट आले, तेव्हा खा. शरद पवार हे नेहमी कणखर सह्याद्री होऊन उभे राहिले आहेत. आजही त्यांना आपण सर्वांनी मिळून साथ दिली पाहिजे, कोरेगावातील स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून सामान्यांना व कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये गुंतवण्याची धमकी देऊन त्रास देत आहेत. आता झालं तेवढं बास झालं, येथून पुढे कोणाला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देऊन पक्षप्रवेश करून घेणे चुकीचं आहे. ही हुकुमशाही मोडून काढायची आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी मेहबूब शेख, आमदार बाळासाहेब पाटील यांची भाषणे झाली. दीपक कदम यांनी प्रास्ताविक केले. घनश्याम शिंदे यांनी आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जयंत पाटील, अमोल कोल्हे, बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
प्रशासन आणि पोलीस दलाला इशारा
शिवस्वराज्य यात्रेमध्ये भाषण करणाऱ्या प्रत्येक नेत्याने प्रशासन आणि पोलीस दल सरकारच्या आणि सरकारमधील घटकांच्या इशारावर चालत असल्याचा आरोप केला. विरोधकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून बदलीच्या भीतीपोटी असे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मेहबूब शेख यांनी थेट पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यावर टीका केली. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी चांगली माणसे आहेत. मात्र, विरोधकांच्या दबावापोटी त्यांना खोटी कारवाई करावी लागते, हे योग्य नाही. आचारसंहिता लागू दे त्यानंतर मी एकेकाकडे बघतो, असा इशारा आ. शशिकांत शिंदे यांनी दिला.





