प्रभात वृत्तसेवा पुणे – राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (एनआयआरएफ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान घसरण्यामागे प्राध्यापकांची कमतरता हे एक कारण असले, तरी विद्यापीठात सतत होणाऱ्या आंदोलनांमुळे देश- विदेशात निर्माण होणारी नकारात्मक प्रतिमा हेही महत्त्वाचे कारण आहे, असे स्पष्ट मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. विद्यापीठाच्या प्रतिमेवर थेट खापर फोडतानाच, प्राध्यापकांच्या भरतीतील आणि राज्याच्या आर्थिक अडचणी महिन्याभरात मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२६ व्या पदवी प्रदान कार्यक्रमात पाटील बोलत होते. नॅकच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे, सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.डॉ. गोसावी यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यानंतर पाटील म्हणाले, विद्यापीठातील १११ प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता होऊन दीड वर्ष झाले; पण काही नियमांच्या अडचणी आल्या आहेत. महाविद्यालयांतील प्राध्यापकांबाबत राज्याच्या आर्थिक अडचणी आहेत. सगळ्या अडचणींवर मात करून महिन्याभरात ते सगळे मार्गी लागेल. मानांकनासाठी तेवढा एकच निकष असतो का? क्रमवारीबाबत मुख्यमंत्रीही चिंतेत पडले. याबाबत बरीच चर्चा केली, तर यात वेगवेगळे २० निकष आहेत. त्यातील एक आहे विद्यापीठाच्या प्रतिमेचा. मीही विद्यार्थी चळवळीतून आलो आहे. विद्यार्थी, प्रश्न, आंदोलन याविरोधात मी नाही. मात्र, आंदोलनांचे स्वरूप कसे असावे, समन्वयाने प्रश्न सोडवता येतील का, याचा विद्यापीठानेही प्रयत्न करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कधी आंदोलने झालीच नाहीत. याचे कारण रयतेला काय हवे आहे, हे त्यांना आधीच कळायचे, तसेच समाजमाध्यमातून देशभर, जगभर काय संदेश जातो, याचाही विचार केला पाहिजे. विद्यापीठात सतत आंदोलनेच होत आहेत, तर देशातील विद्यार्थी इथे कशाला येतील. विदेशातील विद्यार्थी आपल्याकडे येण्यासाठी या वर्षी आपण एक संस्था नियुक्त केली. त्याचा उत्तम परिणाम दिसून आला आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे, तसेच प्राध्यापक भरती, निधी देणे, सीएसआर मिळवणे, यासाठी मदत करण्यात येईल, असेही पाटील म्हणाले.