निवडणूक लढवणारे पक्ष १०४ टक्क्यांनी वाढले; २००९ ते २०२४ पर्यंतची स्थिती

नवी दिल्ली – देशात २००९ या वर्षी ३६८ राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवली. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत ७५१ पक्षांनी उमेदवार दिले आहेत. म्हणजेच, २००९ ते २०२४ या कालावधीत लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या पक्षांची संख्या १०४ टक्क्यांनी वाढली आहे.
मागील निवडणुकीत (वर्ष २०१९) ६७७ राजकीय पक्ष मैदानात उतरले होते. त्याआधीची म्हणजे २०१४ मधील निवडणूक ४६४ पक्षांनी लढवली. यावेळी एकूण ८ हजार ३६० उमेदवार लोकसभा निवडणुकीत त्यांचे नशीब आजमावत आहेत.
त्यामध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वांधिक ३ हजार ९१५ इतकी आहे. राष्ट्रीय पक्षांचे १ हजार ३३३ उमेदवार आहेत. प्रादेशिक पक्षांनी ५३२ उमेदवार दिले आहेत. तर, २ हजार ५८० उमेदवार इतर नोंदणीकृत पक्षांचे आहेत.
राष्ट्रीय पक्षांचा विचार करता भाजपने सर्वांधिक ४४० उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर, कॉंग्रेसने ३२७ उमेदवारांना तिकीट दिले आहे. लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत.





