Nagar | दुषित पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण

नगर, (प्रतिनिधी) – पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेत नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पाणी उकळून पिले तर हे आजार टाळता येतात.
अन्यथा गॅस्ट्रो, कावीळ यासह अन्य आजार होण्याची शक्यता अधिक असून, पाणी पिताना नागरिकांनी काळजी घ्यावी, अन्यथा हेच दुषित पाणी मानवी जिवाला प्राणघातक ठरून ते रोगराईला आमंत्रण देते.
नगर शहरातील नागरिकांना महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जाते. यासाठी शहरात व उपनगरात एकूण 15 टाक्या आहेत. मनपाकडून वर्षातून एकदा या टाक्यांची स्वच्छता केली जाते.
निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदार संस्थेच्या माध्यमातून काम केले जाते. मनपाचे शहराजवळील विळद येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे.
येथे पाणी शुद्ध करून ते टाक्यांमध्ये टाकले जाते. तेथून ते नगरकरांना जलवाहिनीद्वारे वितरित केले जाते.
त्यातूनच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, हे पाणी आता अधिक काळजीपूर्वक प्यावे लागणार आहे. सध्या पावसाळ्यात नव्याने पाण्याची आवक होत आहे.
त्यातूनच संसर्ग होतो. दूषित पाणी पिल्याने जुलाब, कावीळ, विषमज्वर, गॅस्ट्रो, पोटदुखी आदी आजार होण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय सुत्रांचे म्हणणे आहे.




