ग्राहकोपयोगी वस्तू महागल्या

नवी दिल्ली – नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर एअर कंडीशनर आणि रेफ्रिजेटरच्या दरात विविध कंपन्यांनी वाढ केली आहे. एकूणच महागाई वाढल्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले असल्यामुळे आम्हाला ही दरवाढ करावी लागत असल्याचे या कंपन्यांनी सांगितले.
वॉशिंग मशीनच्या किमतीही पाच ते दहा टक्क्यांनी वाढणार असून ही वाढ मार्च महिन्यापूर्वी होईल असे कंपन्यांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार पॅनासोनीक, एलजी, हेलर या कंपन्यानी अगोदरच दरवाढ जाहीर केली आहे. तर सोनी, हिताची, गोदरेज अप्लायन्सेस लवकरच दरवाढ करण्याची शक्यता आहे.
कंजूमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्यफॅक्चरर्स असोसिएशन या संघटनेने म्हटले आहे की, सर्वच ग्राहकोपयोगी कंपन्या जानेवारी ते मार्च या कालावधीत पाच ते सात टक्क्यांची दरवाढ करू शकतात. हेलर अपलायसेन्स इंडिया या कंपनीचे अध्यक्ष सतीश एन एस यांनी सांगितले की केवळ कच्च्या मालाच्या किमती वाढल्या नाहीत तर वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
कंपनीने एसीच्या किमतीत दहा टक्के वाढ केली आहे. यामध्ये आणखी वाढ करण्याची शक्यता खुली असल्याचे कंपनीने सांगितले. एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष दीपक बंसल यांनी सांगितले की, लॉक डाऊन आणि इतर कारणांमुळे जनतेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आम्ही ही दरवाढ करण्याचे आतापर्यंत टाळले होते. मात्र आता उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे आम्हाला दरवाढ करणे गरजेचे झाले आहे. काही कंपन्या अचानक मोठी दरवाढ करण्याचे टाळत आहेत.
त्याऐवजी टप्प्या टप्प्यात मार्च महिन्यापर्यंत ही दरवाढ केली जाण्याची शक्यता आहे. उत्सवाच्या काळामध्ये ही दरवाढ करण्यावर काही कंपन्यांनी विचार केला होता. मात्र त्यामुळे खरेदीवर परिणाम होईल या भीतीमुळे उत्सवाच्या काळामध्ये कंपन्यांनी ही दरवाढ टाळली होती. जर आगामी काळात जागतिक पातळीवर कच्च्या मालाचे दर स्थिरावले आणि पुरवठा साखळीतील अडथळे कमी झाले तर कंपन्या पुन्हा दर कपात करण्याच्या शक्यतेवर विचार करू शकतात.





