Stock Market: जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश

मुंबई – अमेरिकेत व्याजदर कपातीसाठी पूरक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जागतिक शेअर बाजारामध्ये उमेदीचे वातावरण होते. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला. निर्देशांक अल्प प्रमाणात का होईना वाढण्यास मदत झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 76 अंकांनी वाढून 80,787 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 32 अंकांनी म्हणजे 0.13 टक्क्यांनी वाढून 24,773 अंकावर बंद झाला. सकाळच्या सत्रामध्ये निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र नंतर किरकोळ गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्यामुळे निर्देशांकांना उच्च पातळी राखता आली नाही.
टाटा मोटर्स, महिंद्रा, मारुती, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्या आघाडीवर होत्या. तर एशियन पेंट्स, एचसीएल टेक्नॉलॉजी, टेक महिंद्रा, लार्सन अँड ट्यूब्रो, टीसीएस, पावर ग्रीड, सनफार्मा या कंपन्या पिछाडीवर राहिल्या.
जिओजीत वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, जीएसटी दर कपातीचा ज्या क्षेत्रांना फायदा होणार आहे ती क्षेत्र तेजित होती. मात्र निर्देशांक उंचावल्यानंतर नफेखोरी वाढत आहे. अमेरिकेत बेरोजगारी वाढल्यानंतर तेथे व्याजदर कपात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले.




