ग्राहक दिन : रोज होतेय ग्राहकांची फसवणूक

फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये वाढ
पिंपरी – निर्धारित दरापेक्षा जास्त दर आकरणे, कालबाह्य झालेल्या वस्तुंची विक्री, भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री यासह विविध प्रकारे शहरात रोज ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. जीएसटी कमी होऊनही बड्या कंपन्यांनी देखील आपल्या उत्पादनाचे दर तसेच ठेवले असून नागरिकांसाठी करात मिळालेल्या सवलतीचा आर्थिक लाभ कंपन्या स्वतःच घेत आहेत. 24 डिसेंबर हा दिवस ग्राहक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र ग्राहक दिनी केवळ जनजागृतीचे कार्यक्रम होतात, फसवणूक रोखण्यासाठी कोणत्याही विशेष उपायायोजना होताना दिसत नाही.
सध्याच्या काळ डिजिटल असला तरी सध्या आणि डिजिटल बाजारपेठेमध्येही ग्राहकांना अनेक प्रकारची प्रलोभने दाखवून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी परिसरात तरा वाहनांच्या सुट्या भागांपासून कित्येक वस्तू नकली मिळत आहेत. किंमत तेवढीच मोजून नागरिकांना नकली वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. परंतु याबाबत कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक कायदा, वजन मापे कायदा, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा असे निरनिराळे बरेचसे कायदे अंमलात आले. मात्र, या कायद्याची अनेक ग्राहकांना माहिती नसते तर अनेकवेळा कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी नाही. त्यामुळे विविध माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होण्याच्या घटना अद्याप थांबलेल्या नाहीत. आज करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
बिलांच्या पावतीला “खो’
वस्तू व पदार्थांच्या किंमतींमधून ग्राहकांची फसवणूक होऊ नये, तसेच शासनाचा कर बुडू नये म्हणून ग्राहकांना छापील अधिकृत बिल पावती देणे आवश्यक आहे, मात्र, या नियमाची दुकानदार व व्यावसायिकांकडून पायमल्ली होते. मागणी केल्याशिवाय बिल दिले जात नाही. बिल मागितले तरी जीएसटीचे पाच ते दहा टक्के अजून द्या, अशी सरळ मागणी व्यावसायिकांकडून होत असल्याने ग्राहकही बिल न घेताच वस्तू विकत घेतात.
कायद्याचाही धाक नाही
अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणारी टोळीच सध्या सक्रिय झाल्याने मानवी आरोग्य धोक्यात सापडले आहे. हातगाड्यांपासून ते हॉटेल रेस्टॉरेंटपर्यंत कोणाचेही नियंत्रण नाही. शहरात अन्न आणि औषध प्रशासनाचे कार्यालयही नाही. पुण्यातूनच पिंपरी-चिंचवड शहराचा कारभार हाकला जात आहे. शहराच्या वाढलेल्या विस्ताराच्या तुलनेत कर्मचारीही कमी आहेत. यामुळे भेसळबहाद्दरांसाठी हे शहर मोकळे रान झाले आहे.




