Construction : शाळेला खेटून बांधकाम; धुळीने चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात!
रहाटणीतील न्यू सिटी प्राईड स्कूललगत सिमेंटचा धुरळा

पिंपरी – शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे अपेक्षित असताना रहाटणी येथील न्यू सिटी प्राईड स्कूलमधील विद्यार्थ्यांना मात्र बांधकामाच्या धुळीचा सामना करावा लागत आहे.
शाळेला लागूनच सुरू असलेल्या ओक स्टोन रिॲलिटीच्या बांधकाम प्रकल्पातून उडणारा सिमेंटचा धुरळा थेट शाळेच्या परिसरात पसरत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बांधकामस्थळी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप पालकांनी केला असून, संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
न्यू सिटी प्राईड स्कूल आणि बांधकाम प्रकल्प यांच्यात अवघे दहा फुटांचे अंतर आहे. या शाळेत नर्सरी ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांचाही समावेश आहे. बांधकामाच्या ठिकाणाहून उडणारी सिमेंटची धूळ हवेत पसरून शाळेच्या आवारात पोहोचत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना श्वसनाचे विकार, ॲलर्जी, खोकला तसेच डोळ्यांची जळजळ अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
बांधकाम सुरू असताना परिसरात नियमित पाणी मारणे, धूळ रोखण्यासाठी संरक्षक जाळी लावणे, बांधकाम साहित्य झाकून ठेवणे आदी खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषतः शाळा आणि लहान मुलांची वर्दळ असलेल्या परिसरात अधिक दक्षता घेणे अपेक्षित आहे. मात्र, या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
प्रशासनाच्या पाहणीकडे पालकांचे लक्ष
या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने बांधकामस्थळाची पाहणी करावी. धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत की नाही, याची तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. संभाव्य आरोग्यधोका टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शाळेतील विद्यार्थ्यांना धुळीच्या त्रासातून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





