Khalapur News: पाणी अडवण्यासाठी बंधाऱ्यांची उभारणी
Khalapur News: उपलब्ध जलस्रोतांच्या संवर्धनावर भर

खालापूर – पाण्याची बचत आणि उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने वावरले ग्रामपंचायतीच्या वतीने पाझर तलावाच्या पाण्यावर तीन बंधारे बांधण्यात आले आहेत. पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश देत राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यास आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्यास मदत होणार आहे.
खालापूर पंचायत समितीमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत मिळालेल्या मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायतीने हा उपक्रम हाती घेतला. गावातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे, उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करणे आणि जलसंधारणाला चालना देणे, हा त्यामागील उद्देश आहे. त्यानुसार पाझर तलावाच्या पाण्यावर तीन बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे.
सरपंच प्रिया प्रफुल्ल विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. गावाच्या विकासकामांसोबतच पाणी व्यवस्थापन आणि जलसंधारणाच्या कामांनाही प्राधान्य दिले जात आहे.
पाझर तलावावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल विचारे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच रोशन मोरे आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण पेमारे यांनी पाहणी केली. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि संवर्धन करण्याची गरज या उपक्रमातून अधोरेखित झाली आहे.





