Parenting tips : मुलांच्या प्रत्येक हट्टाला ‘हो’ म्हणणे ठरतेय घातक! नकार पचवण्याची क्षमता हरवतेय
Parenting tips : पालक-मुलांमधील संवादाचा अभावही ठरतोय गंभीर कारण

पिंपरी – मुलांनी काही मागितले की ते तात्काळ मिळवून देणे, त्यांच्या प्रत्येक हट्टापुढे झुकणे आणि नकार देणे टाळणे, ही पालकत्वाची योग्य पद्धत नाही. अशा सवयीमुळे मुलांना प्रतीक्षा करण्याची सवय राहत नाही. नकार स्वीकारण्याची क्षमताही कमी होते. अपेक्षा पूर्ण न झाल्यास राग, आक्रमकता आणि टोकाची प्रतिक्रिया देण्याची शक्यता वाढते.
चिखलीमध्ये वडिलांनी मोबाइल तपासला या कारणावरून एका शाळकरी मुलीने आत्महत्या केली. तसेच केवळ आयफोन मिळाला नाही म्हणून एकत तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. त्याला वाचविण्याच्या नादात त्याच्या वडील आणि आईचाही मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका म्हणून पाहून चालणार नाही. मुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचा विचार करण्याची गरज या घटनेने निर्माण केली आहे.
Pune District : कुरुळी बर्गेवस्तीतील बंद रस्ता पुन्हा खुला
प्रत्येक मागणी पूर्ण करण्याचे परिणाम
लहानपणापासून मुलाने काही मागितले की ते लगेच देण्याची सवय लावली जाते. खेळणी असो, मोबाइल असो किंवा महागडी इलेक्ट्रॉनिक वस्तू असो. मुलाचा हट्ट पूर्ण केला जातो. त्यामुळे ‘मला हवे आहे म्हणजे ते मिळालेच पाहिजे’, अशी मानसिकता तयार होऊ शकते. अशा मुलांना नकार स्वीकारणे कठीण जाते. इच्छा पूर्ण झाली नाही तर ते अस्वस्थ होतात. राग व्यक्त करतात. काही वेळा पालकांशी आक्रमकपणे वागतात.
महागड्या वस्तूंपेक्षा संवाद महत्त्वाचा
मुलांना महागड्या वस्तू देणे म्हणजे प्रेम व्यक्त करणे नव्हे. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधणे अधिक महत्त्वाचे आहे. घरची आर्थिक परिस्थिती त्यांना समजावून सांगावी. प्रत्येक वस्तू लगेच मिळणार नाही, हे स्पष्ट करावे.
‘आत्ता शक्य नाही’, ‘काही दिवसांनी घेऊ’, ‘याऐवजी हा पर्याय घेऊ’, असे सांगण्याची सवय पालकांनी लावावी. त्यामुळे मुलांना संयम आणि प्रतीक्षा शिकता येते.
पालकांचा वेळ कमी; मुलांच्या अपेक्षा वाढल्या
आज अनेक पालक नोकरी, व्यवसाय आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतात. मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. त्याची भरपाई महागड्या वस्तू देऊन केली जाते. मुलाला वेळ देण्याऐवजी वस्तू देणे सोपे वाटते. मात्र, यामुळे पालक आणि मुलांमधील भावनिक अंतर वाढू शकते. मुलांच्या मनातील प्रश्न, असुरक्षितता किंवा नाराजी पालकांना समजत नाही. योग्य वेळी संवाद न झाल्यास छोटा प्रश्नही मोठा होऊ शकतो.
‘नाही’ म्हणणेही पालकत्वाचा भाग
मुलांना योग्य वेळी ‘नाही’ म्हणणे आवश्यक आहे. मात्र, तो नकार अपमानास्पद पद्धतीने देऊ नये. त्यामागचे कारण शांतपणे समजावून सांगावे. मुलाने एखादी महागडी वस्तू मागितली तर त्याची गरज काय आहे, हे विचारावे. ती वस्तू सध्या का घेता येणार नाही, हे स्पष्ट करावे. शक्य असल्यास परवडणारा पर्याय द्यावा.
धमकीकडे दुर्लक्ष नको
मुलाने मागणी पूर्ण झाली नाही म्हणून स्वतःला इजा करण्याची किंवा टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी दिल्यास ती हलक्यात घेऊ नये. ‘तो फक्त धमकी देतोय’, असे समजून दुर्लक्ष करू नये. अशा वेळी मुलाशी शांतपणे बोलावे. परिस्थिती गंभीर वाटल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.
धोकादायक परिस्थितीत संयम महत्त्वाचा
मुलगा अत्यंत संतप्त किंवा आक्रमक अवस्थेत असेल तर पालकांनीही आक्रमक होऊ नये. धोकादायक ठिकाणी मुलाला अचानक पकडण्याचा प्रयत्न करणेही टाळावे. अशा वेळी परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. शांतपणे संवाद साधणे, त्याचे लक्ष दुसरीकडे वळवणे आणि आवश्यक असल्यास तातडीची मदत घेणे महत्त्वाचे आहे.
मुलांना ‘हवे ते’ नव्हे, ‘योग्य ते’ देण्याची गरज
पालकांनी मुलांच्या प्रत्येक मागणीला होकार देण्याऐवजी त्यांना योग्य-अयोग्य यातील फरक शिकवणे गरजेचे आहे. पैसा, वस्तू आणि सुखसोयी यापेक्षा संयम, नकार स्वीकारण्याची क्षमता आणि भावनिक संवाद महत्त्वाचा आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील घटनेने याच बाबीची गंभीर जाणीव करून दिली आहे. मुलांच्या प्रत्येक हट्टापुढे झुकण्यापेक्षा त्यांना ‘नाही’ ऐकण्याची आणि स्वीकारण्याची ताकद देणे, हेच आजच्या पालकांसमोरील मोठे आव्हान आहे.
Baramati News : विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच उद्योजकतेचा निर्णय घ्यावा : उद्योजक फुलचंद जैन






