Baramati News : विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच उद्योजकतेचा निर्णय घ्यावा : उद्योजक फुलचंद जैन
Baramati News : उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष डॉ. सचिन गाडेकर यांनी एनइपी 2020 आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळासोबतच नवीन उद्योजक घडतील, असा विश्वास व्यक्त केला.

बारामती : अविद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण घेत असतानाच उद्योजकतेचा निर्णय घ्यावा, असे आवाहन संभाजीनगर येथील रवी मसालेचे व्यवस्थापकीय संचालक व उद्योजक फुलचंद जैन यांनी केले. अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात ‘विकसित भारतासाठी एनइपी 2020 अंतर्गत कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी : नवोपक्रम, रोजगारक्षमता आणि उद्योजकता’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. उद्घाटनप्रसंगी उद्योजक फुलचंद जैन यांनी अन्नप्रक्रिया उद्योगातील संधी, आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि ग्राहकांचा विश्वास यांचे महत्त्व स्पष्ट केले.
उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष डॉ. सचिन गाडेकर यांनी एनइपी 2020 आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळासोबतच नवीन उद्योजक घडतील, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. भगवान साखले व मेघना बडजाते यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अभिनंदन शहा उपस्थित होते. रतन टाटा महाराष्ट्र स्टेट स्किल्स युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी ऑनलाइन माध्यमातून परिषदेच्या आयोजनास शुभेच्छा दिल्या.
परिषदेच्या द्वितीय दिवशी हनी ट्रॅप, डिजिटल अरेस्ट, लाईट बिल फ्रॉड, एक्सिडेंट फ्रॉड यांसारखे सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सायबर सुरक्षा तज्ज्ञ धनंजय देशपांडे यांनी केले. दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डी. लेक्टा फूड्स प्रा. लि.चे कन्सल्टंट अनंत सुमंत, उपप्राचार्या डॉ. प्रा.योगिनी मुळे, सहसमन्वयक डॉ. प्रा. अजित तेळवे, आयोजन सचिव डॉ. वाजिद खान विभागप्रमुख प्रा. राहुल शहा प्रा. राहूल चौधरी, प्रा.महेश फुले प्रा. सलमा शेख, प्रा.पूजा गायकवाड आणि सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
देशपांडे यांनी विविध सायबर गुन्ह्यांचे स्वरूप स्पष्ट करून त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजना सांगितल्या. सोशल मीडियावर खासगी माहिती, कुटुंबीयांचे फोटो, प्रवासाची माहिती किंवा संपत्तीविषयक छायाचित्रे अनावश्यकपणे शेअर करू नयेत. संशयास्पद माहितीची फॅक्ट-चेकद्वारे खातरजमा करावी, आधारकार्डची प्रत अनावश्यक ठिकाणी देऊ नये तसेच ऑनलाइन बँकिंग, ई-मेल आणि UPI चे पासवर्ड नियमितपणे बदलावेत, असा सल्ला त्यांनी दिला. सायबर गुन्हा घडल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइनवर तक्रार करून पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.
उपप्राचार्या आणि समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. प्रा. योगिनी मुळे यांनी केला. असोसिएशन ऑफ फूड सायंटिस्ट्स अँड टेक्नॉलॉजिस्ट्स ऑफ इंडिया” महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष उमेश कांबळे यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ध्येय निश्चित करण्याचा सल्ला दिला. ग्लोबल अॅग्रोव्हेट, पुणेचे सीईओ विकास वणवे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या परिषदेला अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) सचिव मिलिंद शाह वाघोलीकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.





