Electricity: विजेचा सतत लपंडाव, वीज बिलात मात्र भरमसाठ वाढ!
Electricity: तळवडे, देहू, देहूरोड परिसरातील ग्राहकांच्या तक्रारी

देहूगाव – तळवडे, देहू आणि देहूरोड परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सणासुदीच्या काळातही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
वारंवार वीज जाण्यामुळे घरगुती कामांसह विविध लघुउद्योग आणि व्यावसायिक कामकाजावर परिणाम होत आहे. मसाला गिरण्या, पीठ गिरण्या, दुकाने, छोटे उद्योग तसेच ऑनलाइन आणि संगणकीय कामांनाही याचा फटका बसत आहे.
गणेशोत्सव तसेच इतर सणांच्या काळात घरांमध्ये आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये विजेची गरज वाढलेली असते. मात्र, याच काळात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. काही भागांत अल्प कालावधीसाठी तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक वेळ वीजपुरवठा बंद राहत असल्याच्या तक्रारी आहेत. वीज गेल्यानंतर नेमका पुरवठा कधी सुरळीत होईल, याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती मिळत नसल्याने संभ्रम निर्माण होत आहे.
मसाला आणि पीठ गिरण्यांसह विविध छोटे व्यवसाय वीजपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. वीज नसल्याने गिरण्यांचे काम थांबते. ग्राहकांकडून आलेली कामे वेळेत पूर्ण करता येत नसल्याने व्यावसायिकांचे नुकसान होते. दुकानांमधील संगणक, प्रिंटर, इंटरनेट उपकरणे तसेच इतर यंत्रणाही बंद पडत असल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे.
एकीकडे वीजपुरवठा सुरळीत नसताना दुसरीकडे वाढीव वीजबिलांमुळे ग्राहकांच्या अडचणीत भर पडली आहे. मीटर रीडिंगसाठी कर्मचारी नियमितपणे येत नसल्याने सरासरी वीज वापराच्या आधारे बिल आकारले जात असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. काही ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष वापरापेक्षा अधिक रकमेची बिले प्राप्त होत आहेत.
खंडित वीजपुरवठा, वाढीव वीजबिले आणि मीटर बदलाच्या तक्रारी या तिन्ही बाबींमुळे परिसरातील ग्राहकांमध्ये असंतोष वाढत आहे. महावितरणाने तळवडे, देहू आणि देहूरोड परिसरातील वीजपुरवठा यंत्रणेची तपासणी करून वारंवार होणारे बिघाड दूर करावेत. तसेच फॉल्टी मीटरची प्रत्यक्ष तपासणी करून योग्य वीजवापरानुसार बिल आकारावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तक्रार नोंदवूनही अनेकदा नागरिकांना पुरेशा माहितीअभावी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे तक्रारींसाठी प्रभावी यंत्रणा उपलब्ध करून देण्याबरोबरच वाढीव बिलांच्या तक्रारींची स्वतंत्रपणे तपासणी करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
मीटर बदलण्याची सक्ती न करता ग्राहकांना योग्य माहिती द्यावी आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
मीटर दुरुस्तीऐवजी नवीन मीटरचा आग्रह
मीटरमध्ये तांत्रिक अडचण असल्यास ती दूर करण्याऐवजी नवीन मीटर बसविण्याचा आग्रह केला जात असल्याचा आरोपही ग्राहकांकडून करण्यात येत आहे. ‘सध्याच्या मीटरची नोंद संगणक प्रणालीत दुरुस्त होत नाही. त्यामुळे नवीन मीटर बसवून घ्या,’ असे अधिकारी सांगत असल्याचा दावा एका ग्राहकाने केला आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
गृहउपकरणांवरही मोठा परिणाम
वीजपुरवठा वारंवार सुरू-बंद होत असल्याने घरातील विद्युत उपकरणांवरही परिणाम होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. फ्रिज, टीव्ही, संगणक, पंखे, पंप यांसारखी उपकरणे विजेवर अवलंबून असतात. अचानक वीजपुरवठा खंडित होणे आणि पुन्हा सुरू होणे यामुळे उपकरणांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागू शकतो.
Pune District : निमगाव म्हाळुंगीत दूषित पाण्याने हजारो मासे मृत





